News Flash

‘लस, नियमांचे पालन हाच उपाय’

देशात करोनाची नवी लाट की नवे विषाणू?

करोनाच्या रुग्णांची संख्या महाराष्ट्रासह देशाच्या काही राज्यात वाढत चालली असली, तरी ही नवी लाट आहे असे म्हणता येत नाही, सध्याच्या परिस्थितीत तरी करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण व निर्बंधांचे पालन करणे हाच उपाय आहे, असे देशातील वैज्ञानिकांनी म्हटले आहे. लोकांनी मुखपट्टी वापरून व सामाजिक अंतर पाळून लसीकरण करून घेतले, तर हा धोका कमी होऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार करोनाचे २४,८८२ नवीन रुग्ण सापडले असून रुग्णवाढीचा आलेख उंचावत चालला आहे. २० डिसेंबरपासून सर्वांत जास्त एका दिवसातील रुग्णवाढ आता नोंदली गेली असून २० डिसेंबरला २६,६२४ इतके रुग्ण वाढले होते.

सगळ्यांच्या मनात आता करोनाची ही नवी लाट आहे काय, असा प्रश्न आहे. त्यावर वैज्ञानिकांनी सांगितले की, ही नवी लाट म्हणता येणार नाही. कोविड नियमांचे पालन केले असते तर या संसर्गावर नियंत्रण ठेवता आले असते. सीएसआयआरच्या इन्स्टिट्यूट ऑफ जिनॉमिक्स अँड इंटिग्रेटिव्ह बायॉलॉजी या संस्थेचे अनुराग अग्रवाल यांनी सांगितले की, त्यांच्या संस्थेतील वैज्ञानिकांनी रुग्णवाढ ही नियमांचे पालन न केल्याने झाली की, काही नवीन प्रकारचे करोना विषाणू यात आहेत, याचा तपास सुरू केला आहे. सध्या तरी ही नवी लाट आहे, असे स्पष्टपणे म्हणता येत नाही. कोविड प्रतिबंधक वर्तन व लसीकरण हे दोनच उपाय यावर असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या वरिष्ठ अधिष्ठाता व अ‍ॅप्लाइड मॅथॅमॅटिकल सायन्सेसच्या प्रमुख मोनिका गुलाटी यांनी सांगितले की, इतर देशांपेक्षा भारताचा करोना आलेख बराच उंचावला आहे. त्यात नवीन करोना विषाणूंचा सहभाग आहे. कारण आधीच्या विषाणूची संसर्गजन्यता फार जास्त नव्हती. गुलाटी यांनी सांगितले की, रुग्णवाढ ही आधीपेक्षा खूपच जास्त असून त्याला काही कारणे आहेत. ज्या देशात करोनाचे नवे विषाणू आले तेथे ते मूळ विषाणूपेक्षा घातक आहेत. भारतात करोनाचा आलेख उंचावण्याची कारणे वेगळी आहेत. एकीकडे आपण लसीकरण चालू केले असले, तरी ज्या विषाणूवर आपण हे लसीकरण करीत आहोत, त्याचा संसर्गजन्यता दर कमी आहे. आता नवीन विषाणू असू शकतात.

सात दिवसांत करोनाचे रुग्ण भारतात ६७ टक्के वाढले असून ११ फेब्रुवारीला १०,९८८ रुग्ण वाढले तर बुधवारी संपलेल्या आठवड्यात हे प्रमाण १८,३७१ झाले. देशात फार कमी प्रमाणात चाचण्या होत असून त्यामुळे  करोना सकारात्मकता दर कमी दिसत आहे. पण बारकाईने बघितले तर गेल्या महिन्यापासून तो वाढतच आहे.

सीएसआयआरच्या सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायॉलॉजी या संस्थेतील संचालक राकेश मिश्रा यांनी सांगितले की, जर आताची परिस्थिती कायम राहिली तर नवीन लाट येईल. देशातच करोनाचे नवे उत्परिवर्तित विषाणू तयार होतील. नवीन लाटेची शक्यता आहे. महाराष्ट्रासह काही राज्यात हे दिसत आहे. कोविड प्रतिबंधक वर्तन ठेवणे त्यात महत्त्वाचे आहे. सध्या अनेक शहरे व राज्यांत रुग्ण वाढत आहेत. ही वाढ केवळ नियम न पाळण्यामुळे झालेली आहे. जर असेच वर्तन लोक चालू ठेवणार असतील, तर देशात नवीन करोना विषाणूही वेगाने पसरू शकतात.

विषाणूतज्ज्ञ उपासना राय यांनी सांगितले की, ही दुसरी लाट आहे असे लगेच म्हणता येणार नाही. स्थानिक संक्रमणाच्या दिशेने ही चिन्हे संकेत करीत आहेत. दुसरी लाट येईल किंवा नाही पण आपण वाईट स्थितीला तोंड देण्यास सज्ज असले पाहिजे. त्यांच्या मते नवीन करोना विषाणूंचे प्रकार आले आहेत पण ते या वाढीस कारण असतील की नाही हे अजून स्पष्ट झालेले नाही. देशात उत्परिवर्तित होत असलेल्या विषाणूंवर नजर ठेवणे गरजेचे आहे.  अंतर, मुखपट्टी व सॅनिटायझर किंवा साबणाचा वापर हेच उपाय आहेत.

‘सामुदायिक प्रतिकारशक्तीसाठी स्वेच्छेने लस घ्यावी’

अनुराग अग्रवाल यांनी सांगितले की, देशात सामुदायिक  प्रतिकारशक्ती येण्यास वेळ लागेल. कारण अजून अनेक लोकांमध्ये प्रतिकारक्षमता नाही. त्यामुळे संसर्ग चालूच आहे. लोकांनी लस घेण्यासाठी पुढे आले पाहिजे. लसीकरण सक्तीचे नाही. २५० रुपयाला एक लस याप्रमाणे दोन मात्रांचा खर्च पाचशे रुपये आहे. त्यामुळे लोक स्वतङ्महून लस घेऊ शकतात. त्यामुळे संससर्गाची साखळी तुटेल. सध्या पात्र नागरिकांनाच लस देण्यावर भर दिला जात आहे पण सामुदायिक प्रतिकारशक्ती निर्माण करण्यासाठी इतरांनी स्वेच्छेने लस घ्यावी.

उद्योगपती रतन टाटा यांना लस

नवी दिल्ली : प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी शनिवारी लशीची पहिली मात्रा घेतली. टाटा यांनी समाज माध्यमावरील टिपणीत म्हटले आहे,की लसीकरणात कुठले कष्ट नाहीत व वेदनाही नाहीत. लस घेतल्याचा आनंदच आहे. कोविड रुग्णांची संख्या देशात वाढत आहे अशा परिस्थितीत लसीकरण हाच महत्त्वाचा उपाय आहे. नजीकच्या काळात सर्वांना लसीचे संरक्षण मिळेल अशी अपेक्षा आहे. भारतात दिवसभरात २३२८५ रुग्ण सापडले असून ७८ दिवसातील हा उच्चांक आहे. एकूण कोविड रुग्ण संख्या आता १, १३,०८,८४६ झाली आहे. आतापर्यंत भारतात २.८० कोटी लोकांना कोविड १९ प्रतिबंधक लस देण्यात आली असून शुक्रवारी १८.४० लाख जणांना लस देण्यात आली. देशात १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू झाले असून २ फेब्रुवारीला आघाडीवर काम करणाऱ्या लोकांचे लसीकरण सुरू करण्यात आले. १ मार्चपासून लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू झाला असून त्यात साठ वर्षे वयावरील व्यक्तींचा समावेश आहे. ४५ व त्यावरील वयाच्या सह आजार असलेल्या व्यक्तींनाही लस दिली जात आहे.

देशात शुक्रवारी २० लाखांहून अधिक जणांचे लसीकरण

नवी दिल्ली : देशात शुक्रवारी २० लाखांहून अधिक जणांना करोनाची लस टोचण्यात आली असून हा आतापर्यंत एका दिवसातील उच्चांक आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने शनिवारी सांगण्यात आले.

आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी आणि करोनायोद्धे मिळून १६ लाख ३९ हजार ६६३ जणांना लशीची पहिली मात्रा देण्यात आली तर चार लाख १३ हजार ८७४ जणांना लशीची दुसरी मात्रा देण्यात आली.

देशात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आणि ५६ व्या दिवशी २० लाखांहून अधिक जणांचे लसीकरण करण्यात आले. देशात आतापर्यंत एकूण २.८२ कोटींहून अधिक मात्रा देण्यात आल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 14, 2021 12:14 am

Web Title: vaccines rules are the solution for corona abn 97
Next Stories
1 चीनच्या आव्हानाबाबत ‘क्वाड’ नेत्यांमध्ये चर्चा
2 म्यानमार : गोळीबारात ४ ठार
3 स्थानिकांना ७५ टक्के नोकऱ्यांचे द्रमुकचे आश्वासन 
Just Now!
X