करोना विषाणूचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने संपूर्ण देशभरात १७ मे पर्यंत लॉकडाउन वाढवलं आहे. यापुढेही लॉकडाउनमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. या काळात नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळावं यासाठी सरकारी यंत्रणा वारंवार आवाहन करत आहेत. मात्र गुजरातमधून वडोदरा शहरात लॉकडाउन काळात बर्थ-डे पार्टी देणाऱ्या भाजप वॉर्ड अध्यक्षाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यासोबत आणखी ७ जणांवरही पोलिसांनी कारवाई केली आहे.

मंगळवारी रात्री शहरातील तुलसीवाडा भागातले भाजपचे वॉर्ड अध्यक्ष अनिल परमार यांनी आपल्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन आयोजित केलं होतं. या सेलिब्रेशनचे फोटो परमार यांनी सोशल मीडियावर टाकले. हे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या पार्टीमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पायदळी तुडवण्यात आल्याचंही स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं. अटकेत असलेल्या सर्व आरोपींची वैद्यकीय तपासणी केली जाणार असल्याचंही पोलिसांनी यावेळी सांगितलं.

पोलिसांनी वॉर्ड अध्यक्ष अनिल परमार याच्यासह मनिष परमार, नकुल परमार, दक्षेश परमार, मेहुल सोलंकी, चंद्रकांत भांब्रे, राकेश परमार आणि धवल परमान यांना अटक केली आहे. सर्वांवर IPC 269, 270, 188 नियमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पार्टीमध्ये सहभागी असलेल्या अन्य व्यक्तींचाही पोलीस तपास करत आहेत.