गुजरातमधील वडोदरा येथे बुधवारी सकाळी रस्त्यांवर एक वेगळं चित्र पहायला मिळालं. अनेक पोलीस कर्मचारी विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेत सोडण्याचं काम करत होते. यासाठी पीसीआर व्हॅन तसंच दुचाकींचा वापर केला जात होता. वडोदऱ्यात शाळा बस आणि रिक्षाचालकांनी संप पुकारला असून बुधवारी संपाचा दुसरा दिवस होता. वडोदरा वाहतूक पोलीस आणि रस्ते वाहतूक कार्यालयाशी चर्चा फिस्कटल्यानंतर संप चिघळला आहे.

संपाचा फटका विद्यार्थ्यांना बसू नये यासाठी पोलिसांच्या एकूण ४६ दुचाकी, २१ पीसीआर व्हॅन्स आणि नऊ बोलेरो रस्त्यावर धावत होत्या. विद्यार्थ्यांना वेळेत शाळेत पोहोचवण्याची तसंच त्यांना कोणताही त्रास होणार नाही याची पूर्ण जबाबदारी पोलिसांनी घेतली होती. पोलिसांनी शहरातील जवळपास २५० विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला.

जोपर्यंत संप मिटत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांना मदत केली जाईल अशी माहिती वडोदरा वाहतूक एसीपी ए के वनानी यांनी दिली आहे. ‘विद्यार्थ्यांना घेऊन प्रवास करणाऱ्या वाहनांनीही नियम पाळणं गरजेचं आहे. जसं की, प्रमाणापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना घेऊन प्रवास न करणे, विनाकारण गर्दी न करणे वैगेरे. आम्ही यासंबंधी मोहीम सुरु केली आणि असोसिएशनने बंद पुकारला. शाळा नुकत्याच सुरु झाल्या असल्या कारणाने पालकांना आपल्या मुलांना शाळेत सोडणं शक्य नाही हे आम्ही समजू शकतो. म्हणूनच आम्ही विद्यार्थी आणि पालकांच्या मदतीसाठी धाव घ्यायचं ठरवलं आहे. संप मिटत नाही तोपर्यंत आम्ही हे करत राहू’, असंही त्यांनी सांगितलं आहे.

अहमदाबादमध्ये चालक्या स्कूल व्हॅनमधून तीन विद्यार्थ्यी खाली पडल्यानंतर सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला होता. या व्हॅनमधून २२ विद्यार्थी प्रवास करत होते. यामुळे दरवाजा नीट लागला नव्हता आणि मुलं खाली पडली. नियमांचं पालन न केल्याबद्दल मंगळवारी पोलिसांनी तीन बस, १२ रिक्षा आणि १६ व्हॅन्सची तपासणी केली. यामुळे संप पुकारण्यात आला.