मथुरा येथे २५ मे रोजी नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होत असलेल्या कार्यक्रमाच्या निमंत्रणावरून पुन्हा एकदा मोदी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्यातील वितुष्ट समोर आले आहे. पंडीत दिनदयाळ उपाध्याय जन्मभूमी स्मारक समितीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमासाठी मोदी उपस्थित राहणार आहेत. त्यासाठी समितीकडून माजी पंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांना निमंत्रण पाठविण्यात आले आहे. मात्र, त्याचवेळी समितीला वाजपेयींचे साथीदार लालकृष्ण अडवाणींचा पुरता विसर पडला आहे. अडवाणींनी कधीही पंडीत दिनदयाळ उपाध्याय जन्मभूमी स्मारक समितीचे सदस्यपद न भूषविल्यामुळे त्यांना निमंत्रण न देण्यात आल्याचे कारण समितीकडून पुढे करण्यात आले आहे.
येत्या २५ मे रोजी मथुरेतील नागला चंद्रभान या गावात दिनदयाळ उपाध्याय यांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम होत आहे. अटलबिहारी वाजपेयी प्रकृतीच्या कारणास्तव या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकणार नाहीत, याची आम्हाला कल्पना असल्याचे समितीचे सचिव रोशन लाल यांनी सांगितले. मात्र, ते समितीचे पहिले अध्यक्ष असल्याने त्यांना निमंत्रण पाठविण्यात आले. परंतु, लालकृष्ण अडवाणी कधीही या समितीचा भाग नव्हते त्यामुळे त्यांना निमंत्रण न पाठविण्यात आल्याचे रोशन लाल यांनी सांगितले. हाच मुद्दा ग्राह्य धरल्यास नरेंद्र मोदी हेदेखील कधीही या समितीचा भाग नव्हते ही बाब निदर्शन आणून दिल्यानंतर आम्ही फक्त मोदींच्या स्वागतासाठी हा कार्यक्रम आयोजित केल्याचे स्पष्टीकरण समितीकडून देण्यात आले. मोदी अनायसे याठिकाणी प्रचारसभेसाठी येतच आहेत, त्यामुळे आम्हीसुद्धा त्यांचा सत्कार सोहळा आयोजित करायचे ठरविले.
दरम्यान, या कार्यक्रमाला उपस्थित राहणारे बहुतेक जण राष्ट्रीय स्वयंसेवक आणि अन्य संघटनांशी संबधित आहेत. वाजपेयी यांनी २००१मध्ये तर लालकृष्ण अडवाणी यांनी २००२मध्ये काही कार्यक्रमांच्या निमित्ताने पंडीत दिनदयाल उपाध्याय यांच्या निवासस्थानाला भेट दिली होती. मात्र,  नरेंद्र मोदी यांनी याआधी कधीही याठिकाणी भेट दिली नव्हती.