वाराणसी काशी विश्वनाथ मंदिरात आता भाविकांसाठी ड्रेसकोड ठरवण्यात आला आहे. महाकाल मंदिराच्या धर्तीवर आता या ठिकाणी देखील दर्शनासाठी आलेल्या भाविकांना देवास स्पर्श करण्याअगोदर, पुरूषांना धोतर व महिलांना साडी नेसावी करावी लागणार आहे. अशाप्रकारचे कपडे परिधान केल्यानंतरच भाविकांना काशी विश्वनाथ बाबास स्पर्श करून दर्शन करण्याची परवानगी असणार आहे.

तर, पॅन्ट, शर्ट, जीन्स, सूट आदी कपडे घातलेल्या भाविकांना केवळ दूरून दर्शन करता येणार आहे. तसेच, स्पर्श दर्शन हे मंगला आरतीपासून माध्यान्ह आरतीच्या अगोदरपर्यंत मिळणार आहे. मकर संक्रांतीनंतर ही नवी व्यवस्था लागू केली जाणार आहे. रविवारी मंदिर प्रशासनाच्या झालेल्या या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. बैठक धर्मार्थ कार्यमंत्री डॉ. नीळकंठ तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

या बैठकीत तिवारी यांनी काशी विद्वान परिषदेच्या सदस्यांसमोर स्पर्श दर्शनाची व्यवस्था अधिक उत्तम करण्यासंदर्भात प्रस्ताव मांडला. यावर सदस्यांनी उज्जैन येथील महाकाल ज्योतिर्लिंग, रामेश्वर आणि शबरीमाला येथील मंदिराचे दाखले देत अशाप्रकारची व्यवस्था या ठिकाणी लागू करावी असे मत व्यक्त केले.