वाराणसी हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदारसंघ आहे. त्यामुळे या मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचे लक्ष आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ सदैव या मतदारसंघाच्या सेवेसाठी झटताना दिसतात. केंद्रीय मंत्री के जे अल्फान्स यांनी मात्र या मतदारसंघातील अनेक त्रुटी समोर आणल्या असून हा अत्यंत अस्वच्छ मतदारसंघ असल्याची टिप्पणीही त्यांनी केली आहे. वाराणसीमधील वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. शहर कमालीचे अस्वच्छ असून इथे साफसफाईच्या कामांची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. एका केंद्रीय मंत्र्यांनेच वाराणसी मतदारसंघाबद्दल हे वक्तव्य केल्याने भाजपाला घरचा आहेर मिळाल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे भाजपाच्या एका आमदाराने हा मुद्दा खोडत स्वच्छतेत वाराणसी खूप चांगले असल्याचे म्हटले आहे.

आमदार रवींद्र जयस्वाल यांनी स्वच्छतेच्या मापदंडावर वाराणसी देशात सातव्या क्रमांकावर असल्याचे म्हटले आहे. तर समाजवादी पक्षाचे प्रवक्त्या जुही सिंह यांनी मोदी सरकारचे मंत्रीच त्यांनी चार वर्षांत काय काम केले याचा खुलासा करत असल्याचा टोला लगावला.

केंद्रीय पर्यटन मंत्री अल्फान्स हे आपल्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर वाराणसीला आले होते. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले. वाराणसीची परिस्थिती खूप खराब आहे. स्वच्छता अभियानात चांगले काम झालेले नाही. त्यामुळे शहरात सगळीकडे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळेच इथे पर्यटक येत नसल्याचे त्यांनी म्हटले.

वाराणसीमधील सारनाथमध्ये ५ लाख पर्यटक येत आहेत. ही संख्या खूप कमी आहे. येत्या २ वर्षांत १० लाख पर्यंत ती वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे. हे आमचे सर्वांत मोठे उद्धिष्ट असल्याचे ते म्हणाले.