उत्तर प्रदेशच्या मऊ येथे अजगराने गारूड्याचाच गळा आवळल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे, हा प्रकार घडला तेव्हा अनेकांना हा खेळातलाच एक भाग आहे असं वाटलं, त्यामुळे तिथे उपस्थितांनी हा प्रकार मोबाईल कॅमेऱ्यातही शूट केला. पण बराच वेळ झाला तरी गारूड्याकडून काही हालचाल न झाल्याने गर्दीमधील एका तरूणाला गारुडी बेशुद्ध तर पडला नाही ना अशी शंका आली. त्यानंतर अजगराने गारूड्याचा गळा आवळल्याचं उपस्थितांच्या लक्षात आलं.

मिळालेल्या माहितीनुसार, येथील बाजार परिसरात एक गारूडी रस्त्याच्या कडेला अजगराचा खेळ दाखवत होता. अजगर आणि सापाचा खेळ पाहण्यासाठी गारूड्याच्या बाजूला लोकांची गर्दी जमली. अचानक अजगराने गारूड्याच्या गळ्याला वेढा घातला. गारूड्याने अजगराचा वेढा काढण्याचा प्रयत्न केला पण त्याला तो सोडवता आला नाही. तोपर्यंत हा खेळाचाच एक भाग आहे असं उपस्थितांना वाटत होतं. पण बराच वेळ झाला तरी गारूड्याकडून काही हालचाल न झाल्याने गर्दीमधील एका तरूणाला गारुडी बेशुद्ध तर पडला नाही ना अशी शंका आली. त्यानंतर त्या तरूणाने पाणी शिंपडून गारूड्याला उठवण्याचा प्रयत्न केला, तरीही त्याला शुद्ध आली नाही. तेव्हा गारूडी बेशुद्ध झाल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर त्या तरूणाने अजगराचा वेढा काढला आणि रूग्णवाहिका बोलावण्यात आली.

त्यानंतर गारूड्याला प्रथमोचार केंद्रात दाखल केलं. गारुड्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं. पण सध्या मिळालेल्या माहितीनुसार, गारूड्याला वाराणसीच्या खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आलं असून तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.