वाराणसीमध्ये एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. एका कुटुंबाने निवृत्तीवेतनाच्या लालसेपोटी चार महिन्यांपूर्वी मृत पावलेल्या आपल्या ७० वर्षीय आईचा मृतदेह घरात ठेवल्याचे प्रकरण समोर आले आहे. चार महिन्यांपूर्वी मृत पावलेल्या आईवर अंत्यसंस्कार करण्याऐवजी तिच्या मुलांनी रसायन लावून तिचे शरीर घरात ठेवले होते. आईचा मृतदेह खराब होऊन त्याला दुर्गंधी येऊ नये म्हणून त्या मुलांनी हे रसायन लावले होते. पोलिसांच्या छाप्यात ही बाब उघडकीस आली.

ही घटना वाराणसी शहरातील भेलूपूर भागातील कबीर नगर येथे घडली. मृत महिलेचे नाव अमरावती असे होते. अमरावती यांचे पती दयाप्रसाद यांचे वर्ष २००० मध्ये निधन झाले होते. त्यांच्या मृत्यूनंतर अमरावती यांना ४० हजार रूपयांचे निवृत्तीवेतन मिळत असत. दरम्यान, १३ जानेवारी रोजी अमरावती यांचे निधन झाले. निवृत्तीवेतनाच्या मोहापोटीच अमरावती यांच्या मुलांनी तिच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कार न करता मृतदेहाला रसायन लावून ते घरात ठेवले होते. ही मुले दर महिन्याला बँकेतून निवृत्तीवेतन काढून आणत.

अनेक दिवसांपासून अमरावती परिसरात दिसत नसल्यामुळे शेजारच्यांना संशय आला. हे कुटुंबीय कोणालाच आपल्या घरी येऊ देत नव्हते. त्यामुळे काहींनी पोलिसांना फोन करून याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घरी छापा टाकला असता त्यांना धक्काच बसला. त्यांना या घरात अमरावती यांचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी लगेच घर सील केले. अमरावती यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. पोलिसांनी जेव्हा मृतदेह ताब्यात घेतला. तेव्हा मृतदेहाच्या अंगठ्याला शाई लागल्याचे दिसून आले. या अंगठ्याच्या आधारेच ही मुले निवृत्तीवेतन काढत असत. विशेष म्हणजे मृत अमरावती यांच्या कुटुंबात ५ मुले आणि ३ मुली आहेत. यातील २ मुले आणि मुलींचा विवाह झाला आहे. पाचही मुले बेरोजगार होते. त्यांच्या कुटुंबाचा खर्च आईला मिळणाऱ्या निवृत्तीवेतनावरच चालत असत. पोलिसांनी सध्या मुलांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी केली जात आहे.