भारतीय हवाई दलाच्या ताफ्यातील मिग-२१ फायटर विमानांचे सारथ्य करणे ही वर्थमान कुटुंबाची परंपरा राहिली आहे. बुधवारी भारतीय हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानी विमानांना पिटाळून लावताना झालेल्या हवाई संघर्षात विग कमांडर अभिनंदन वर्थमान यांचे मिग-२१ विमान पाकव्याप्त काश्मीरमध्ये कोसळले व ते पाकिस्तानी सैन्याच्या हाती लागले. अभिनंदन यांचे विमान कोसळण्याआधी त्यांनी पाकिस्तानचे अत्याधुनिक एफ-१६ लढाऊ विमान पाडले.

अभिनंदन यांचे वडिल निवृत्त एअरमार्शल स्मिहाकुट्टी वर्थमान हे सुद्धा मिग-२१ विमानाचे वैमानिक होते. ते सुद्धा आयएएफमध्ये टेस्ट पायलट होते. अभिनंदन यांचे वडिल पाच वर्षांपूर्वी हवाई दलातून निवृत्त झाले. ते एअर मार्शल होते. वर्थमान यांच्या एका कौटुंबिक मित्राने माहिती दिली. अभिनंदन यांचे आजोबा सुद्धा हवाई दलामध्ये होते. वर्थमान कुटुंबातील प्रत्येक पिढीने हवाई दलात प्रतिनिधीत्व केले आहे.

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत १९६९ ते १९७२ या काळात अभिनंदनच्या वडिलांसोबत शिक्षण घेणारे निवृत्त विंग कमांडर प्रकाश नवले यांनी सांगितले की, माझे आणि अभिनंदनच्या वडिलांचे हैदराबादच्या हकीमपेट येथील प्रशिक्षण केंद्रात पोस्टींग करण्यात आले होते. एअर फोर्स अॅकेडमीमधून मी फायटर पायलट म्हणून प्रशिक्षण पूर्ण केले. पण नंतर हेलिकॉप्टरकडे वळलो. मी आणि अभिनंदनच्या वडिलांनी काही काळ वैमानिकांना प्रशिक्षण देण्याचे काम केले असे नवले यांनी सांगितले.

नवले आता ६६ वर्षांचे असून १९९४ साली ते हवाई दलातून निवृत्त झाले. वर्थमान तंबाराम येथे राहतात. वर्थमान कुटुंबिय खूप साधे असून त्यांच्याबरोबर आपले कौटुंबिक संबंध आहेत असे नवले यांनी सांगितले. अभिनंदनची आई शोभा वर्थमान या डॉक्टर आहेत. अभिनंदनची बहिण आदिती फ्रान्समध्ये राहते.