सुप्रसिद्ध चित्रकार वासुदेव गायतोंडे यांच्या १९९५ सालच्या अमूर्त चित्राने आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीस काढले आहेत. ‘ख्रिस्तीज’ने आयोजित केलेल्या लिलावात वासुदेव गायतोंडे यांचे चित्र तब्बल २९ कोटी ३० लाख रुपयांना विकले गेले आहे. हे चित्र एका संग्रहकाने विकत घेतले आहे.
याआधी गोव्याचे चित्रकार फ्रांसिस न्यूटन सूजा यांच्या एका चित्राला २६ कोटी मिळाले होते. तर गायतोंडे यांच्याच चित्राला याआधी २३.७० कोटी रुपयांची बोली लागली होती.
गुरू गायतोंडे
वासुदेव गायतोंडे हे भारतातील सुप्रसिद्ध चित्रकारांपैकी एक होते. त्यांचे २००१ साली निधन झाले. अमेरिकेतील ग्युगनहोम म्युझियमतर्फे जगातील चार प्रमुख शहरांत आपल्या चित्रकृतींचे प्रदर्शन भरविण्याचा बहुमान देखील त्यांना मिळाला होता. काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गायतोंडे यांच्या चरित्रग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले होते.

 

painting