गॅसच्या किंमतीच्या मुद्यावरून केजरीवालांनी केलेले सर्व आरोप बिनबुडाचे असून, या किमती तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार ठरवता येतात, असे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री वीरप्पा मोईली यांनी स्पष्ट केले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी सरकारची कार्यपद्धती आणि पेट्रोलियम पदार्थांच्या किमती कशाप्रकारे ठरवल्या जातात, हे लक्षात घेतले पाहिजे. तसेच सीएनजी आणि पीएनजीच्या किंमती कमी ठेवण्यासाठी मी जातीने प्रयत्न करत असल्याचे मोईली यांनी सांगितले. केजरीवालांनी गॅसच्या किमती ठरवण्याच्या मुद्द्यावरून दिल्ली सरकारकडून माजी पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा, मोईली आणि उद्योगपती मुकेश अंबांनी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी घोषणा केली होती. सरकार चालवण्यात आणि पेट्रोलियम पदार्थांच्या किंमती ठरवण्याच्या पद्धतींविषयी केजरीवाल अनभिज्ञ आहेत आणि मला त्याबद्दल सहानुभूती वाटत असल्याचे मोईलींनी सांगितले.