शाकाहार ही दीर्घायुष्याची गुरुकिल्ली असून त्याचा फायदा पुरुषांना सर्वाधिक होतो, असे नवीन संशोधनात दिसून आले आहे. एकूण ७३ हजार लोकांचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. आहार व मृत्यू यांचा परस्परसंबंध हा आतापर्यंत वैज्ञानिकांच्या कुतूहलाचा विषय राहिला आहे. आता अमेरिकी-कॅनेडियन लोकांच्या आहार सवयींच्या आधारे जे संशोधन करण्यात आले आहे, त्यानुसार शाकाहारामुळे अतिरक्तदाब, चयापचयाशी संबंधित विकार, मधुमेह, हृदयरोग यांची जोखीम कमी होते.
कॅलिफोर्नियाच्या लोमा लिंडा विद्यापीठातील मायकेल जे. ऑरलिच व त्यांच्या सहकाऱ्यांनी किमान ७३३०८ स्त्री-पुरुषांच्या आहाराच्या सवयींचा अभ्यास केला. त्यात त्यांनी मांसाहारी, अर्धशाकाहारी, सागरी अन्नपदार्थ घेणारे शाकाहारी, अंडी व दुग्धजन्य पदार्थ घेणारे शाकाहारी अशी वर्गवारी केली होती. या संशोधनात असे दिसून आले. की जे लोक मर्यादित प्रमाणात मांस सेवन करतात व जास्त प्रमाणात फळे व भाज्या सेवन करतात, त्यांच्यात मृत्यूचा धोका तुलनेने कमी असतो. युरोपातील दुसऱ्या एका अभ्यासात असे दिसून आले, की ब्रिटिश शाकाहारी व्यक्तींना मांसाहारी लोकांइतकाच मृत्यूचा धोका असतो, त्यामुळे अजूनही हा खुला प्रश्न आहे असे ऑरलिच यांनी म्हटले आहे.
ऑरलिच यांनी २००२ ते २००७ या काळात आहार व आरोग्याविषयीचे हे संशोधन केले. त्यांच्या आहार सवयी नेमक्या काय आहेत याची वर उल्लेख केलेल्या गटानुसार नोंद करण्यात आली. त्यानंतर २००९ मध्ये त्यांनी राष्ट्रीय डेटाबेसचा वापर करून या सहभागी लोकांमधील किती जण मरण पावले व त्याची कारणे काय होती हे जाणून घेतले. त्याच्या आधारे त्यांनी काही निष्कर्ष काढले.