वाहन कंपन्यांकडून लवकरच नंबर प्लेट असलेल्या कार बाजारात येणार आहेत. वाहनांच्या किंमतीत नंबर प्लेटसाठीचा खर्चाचाही समावेश असेल, अशी माहिती केंद्रीय रस्ते, महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. ही लायसन्स प्लेट ज्याला नंबर प्लेट म्हटले जाते. वाहनाची नोंद झाल्यानंतर संबंधित विभागाकडून हा क्रमांक दिला जातो.

गडकरी म्हणाले की, आम्ही हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता वाहन उत्पादकच प्लेट लावून देतील त्यावर नंतर मशीनच्या साहाय्याने अक्षरं उमटवण्यात येतील. कारच्या किंमतीत याच्या खर्चाचा समावेश केला जाईल. यामुळे ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळेल.

राज्यांकडून ज्या नंबर प्लेट खरेदी केल्या जातात. त्यांची किंमत ही ८०० ते ४० हजार रूपयेपर्यंत असते, असे गडकरी म्हणाले. सध्या संबंधित राज्यातील जिल्ह्यातील उपप्रादेशिक परिवाहन विभागाकडून (आरटीओ) हे क्रमांक दिले जातात. वाहनांच्या सुरक्षेबाबत कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही. वाहन स्वस्त असो किंवा महाग सर्वांसाठी नियम समान असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आम्ही सुरक्षेशी तडजोड करणार नाही. स्वस्त वाहनांसाठी जे सुरक्षेचे नियम असतात. तेच लक्झरी आणि एसयूव्ही वाहनांसाठीही असतील, असे त्यांनी यावेळी सांगितले. सरकारने नुकताच सर्व कंपन्यांना जुलै २०१९ पासून चालकांसाठी एअर बॅग्ज आणि सीट बेल्ट रिमाईंडर अनिवार्य केले आहे. त्याचबरोबर ८० किमी पेक्षा अधिक वेगासाठी स्पीडिंग अलर्ट प्रणाली आणि रिव्हर्स पार्किंगसाठी सेन्सर अनिवार्य केले आहे. प्रदूषणाबाबतही कोणत्याही प्रकारचा समजोता केला जाणार नाही, असे गडकरी यांनी सांगितले.