घनघोर आर्थिक संकटात सापडलेल्या व्हेनेझुएलाच्या चलनाचं अध्यक्ष निकोलस मदुरो यांनी प्रचंड अवमूल्यन केलं आहे. आधीच प्रचंड हाल सोसत असलेल्या व्हेनेझुएलाच्या नागरिकांना आता महागाईची झळ आणखी बसणार आहे. सध्या व्हेनेझुएलाच्या बोलिवर या चलनाची किमत एका डॉलरला 2,85,000 असून ती नजीकच्या काळात आणखी घसरायची शक्यता आहे. देशाला या धक्क्यातून सावरण्यासाठी सरकारनं किमान वेतनाची रक्कम 3,500 टक्क्यांनी वाढवून दर महिना 30 डॉलर केली आहे. यामुळे फारसा दिलासा मिळणार नसला तरी किमान सरकार काहीतरी करायचा प्रयत्न करतंय इतका संदेश लोकांपर्यंत जाणार आहे.

व्हेनेझुएलातल्या आर्थिक समस्येचा स्वाभाविक परिणाम महागाईवर झाला असून ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार देशातील महागाईच्या वाढीचा दर एका वर्षात तब्बल एक लाख टक्के इतके झाला आहे. अनेक वर्षांच्या चुकीच्या धोरणांचा व भ्रष्टाचाराचा परिपाक म्हणजे सध्याचा व्हेनेझुएला आहे. जगातले सगळ्यात जास्त तेलाचे साठे असलेल्या व्हेनेझुएलाची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट असून लाखो लोकं स्थलांतर करत आहेत. लॅटिन अमेरिकेतला एकेकाळचा सगळ्यात समृद्ध असलेला हा देश आर्थिक गर्तेत सापडला आहे. अध्यक्ष मदुरो याची हत्या करायचा प्रयत्नही विरोधकांनी केला होता, ज्यातून ते बचावले.

नवीन चलन आणण्याचा व त्याचं नावही वेगळं ठेवण्याचा प्रयत्नही सरकार करत आहे. नवीन बोलिवर चलन 2 ते 500 या दरात आणण्याचा सरकारचा प्रयत्न असून सध्याच्या 2 लाख बोलिवरच्या बदल्यात नवीन 2 बोलिवर असेल तर पाच कोटी जुन्या बोलिवरच्या किमतीचे नवीन 500 बोलिवर चलन असेल. बदलाच्या काळात दोन्ही चलनं व्यवहारात ठेवण्यात येणार आहेत.

सध्याचे दर बघितले की व्हेनेझुएलातल्या महागाईची व चलनाच्या अवमूल्यनाची कल्पना येऊ शकेल. या घडीला अडीच किलो चिकनसाठी दीड कोटी बोलिवर मोजावे लागतात, एखाद किलो गाजरासाठी 30 लाख बोलिवर तर साध्या टॉयलेट पेपरसाठी 26 लाख बोलिवर द्यावे लागतात. सध्या व्हेनेझुएलामध्ये त्यामुळे गरीबांची संख्या अतिप्रचंड झाली असून बहुतांश जनता दोन वेळचं धड जेवणही करू शकत नाही अशी स्थिती आहे.