टीव्ही चॅनलवर लाइव्ह भाषण सुरू असताना व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो यांच्यावर शनिवारी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न झाला. या हल्ल्यातून मादुरो थोडक्यात बचावले. पण, या हल्ल्यामागे अमेरिका आणि कोलंबियाचा हात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

‘हा हल्ला माझी हत्या करण्यासाठी केला होता, त्यांनी आज मला मारुन टाकण्याचा प्रयत्न केला आहे. या हल्ल्यामागे शेजारील देश कोलंबिया आणि अमेरिकेतील अज्ञातांचा हात आहे’, असा आरोप मादुरो यांनी केला आहे. दरम्यान, अमेरिकेने या आरोपांवर मौन बाळगलं असून कोलंबियाने मात्र हे आरोप फेटाळले आहेत.

दुसरीकडे, या हल्ल्यासाठी मादुरोंनी अमेरिका आणि कोलंबियाला जबाबदार धरलं असलं तरी व्हेनेझुएलाच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यामागे विरोधी पक्षाच्या नेत्यांचा हात असल्याचा आरोप केला आहे.

राजधानी कराकस येथे आपल्या लष्कराच्या शेकडो शिपायांसमोर भाषण करत असताना राष्ट्रपतींवर हल्ल्याचा प्रयत्न झाला. मात्र, निकोलस मादुरो हे या हल्ल्यातून बचावले असून ते सुरक्षित आहेत, पण सात सुरक्षारक्षक या घटनेत जखमी झाले आहेत. हल्ल्यानंतर थोड्याचवेळात व्हेनेझुलेलाचे सुचना मंत्री जॉर्ज रोड्रिग्ज यांनी या घटनेबाबत माहितची देताना सांगितलं की, ड्रोनमध्ये स्फोटकं भरुन राष्ट्रपतींना लक्ष्य करण्याच्या दृष्टीनेच हा हा हल्ला करण्यात आला होता, पण सुरक्षारक्षकांनी हा प्रयत्न हाणून पाडला.

चॅनल NTN24 TV ने या घटनेचा व्हिडीओही ट्विटरवर शेअर केला आहे. यामध्ये भाषणादरम्यान राष्ट्रपती आणि त्यांची पत्नी अचानक आकाशाकडे पाहू लागतात, आणि त्यानंतर स्फोटांचा आवाज ऐकायला येतो. या घटनेची सखोल चौकशी सुरू आहे.