भूसंपादन विधेयकावरून केंद्र सरकारवर हल्लाबोल करणाऱया काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या टीकेला संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी मंगळवारी प्रत्युत्तर दिले. यूपीए सरकारच्या काळात लाखो एकर जमिनी चारपट मोबदल्याशिवाय किंवा कोणत्याही सामाजिक परिणामांचा अभ्यास न करता हस्तगत केल्या गेल्या. त्यामुळे सत्तेत असताना कोणत्याही संमती अथवा चारपट मोबदल्याच्या अटीशिवाय शेतकऱयांची लाखो एकर जमीन लाटणाऱयांना शेतकऱयांच्या हिताबद्दल ब्र सुद्धा काढण्याचा अधिकार नाही, असा टोला व्यंकय्या नायडू यांनी लगावला.

पंतप्रधानांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. त्यासाठी काँग्रेस युवराजांच्या प्रमाणपत्राची गरज नाही, असेही ते पुढे म्हणाले. शेतकऱयांची एक इंचही जमीन मोदींना बळकावू देणार नाही, असे विधान राहुल गांधी यांनी जाहीर सभेत केले होते. प्रत्युत्तर देताना व्यंकय्या नायडू म्हणाले, शेतकऱयांची एक इंचही जमीन अधिग्रहण करू देणार नाही असे राहुल म्हणतात पण त्यांच्या एक इंचाचे नेमके परिमाण किती? हे त्यांनी सांगावे. कारण, याआधी त्यांनी लाखो एकर जमिनीचा कोणत्याही संमतीशिवाय मालकी मिळवली आहे. हरयाणा, आंध्र प्रदेश येथील उदाहरणे देखील आम्ही दिली होती. जमिनी बळकावणारेच आता शेतकऱयांच्या हिताबद्दल बोलू लागलेत.

भूसंपादनाबाबतचा कायदा सरकार आणू पाहत आहे पण त्यावरून जनतेची दिशाभूल करण्याचे काँग्रेस प्रयत्न करीत आहे. त्यामुळे काँग्रेसचे खरे रुप जनतेसमोर आणणे महत्त्वाचे होते. हरियाणामध्ये काँग्रेसने किती एकर जमीन कोणत्याही संमतीशिवाय कशाप्रकारे संपादित केली याचे उदाहरण आम्ही दिले. आंध्र प्रदेश आणि राजस्थान येथेही काँग्रेसने अशाच प्रकारे लाखो एकर जमिनी संपादीत केल्या आहेत. कोणताही रोजगार उपलब्ध करून न देता काँग्रेसने याआधी लाखो एकर जमीन बळकावली असल्याचा आरोपही नायडू यांनी यावेळी केला.