द्वेषमूलक व झुंडीच्या हिंसाचारात सामील असणारे लोक स्वत:ला राष्ट्रवादी म्हणवून घेऊ शकत नाहीत. जमावाकडून होणाऱ्या हिंसाचाराच्या समस्येवर केवळ कायदा करणे हे उत्तर पुरेसे ठरणार नाही तर त्यासाठी सामाजिक वर्तनात बदल  घडवणे आवश्यक आहे असे मत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी एका मुलाखतीत व्यक्त केले आहे. त्यांनी सांगितले की, ‘जमावाच्या हिंसाचाराची कुठलीही घटना घडल्यानंतर त्याचे राजकीय भांडवल करणे चुकीचे आहे. त्याचा संबंध राजकीय पक्षांशी जोडता कामा नये. समाज परिवर्तन महत्त्वाचे आहे. झुंडीचा किंवा जमावाचा हिंसाचार हा कुणा पक्षामुळे होत नसतो. तुम्ही या घटनांना पक्षाशी जोडण्याचे कारण नाही. द्वेषमूलक व जमावाच्या हिंसाचाराबाबत त्यांनी सांगितले की, हा काही नवीन प्रकार नाही. अशा घटना पूर्वीही होत असत. हे सामाजिक वर्तन आहे त्यात बदल झाला पाहिजे. जेव्हा तुम्ही दुसऱ्या माणसाला ठार मारता तेव्हा तुम्ही स्वत:ला राष्ट्रवादी कसे म्हणवून घेऊ शकता. धर्म, जात, रंग, लिंग यांच्या आधारे तुम्ही भेदभाव करीत असाल तर ते चुकीचे आहे. राष्ट्रवाद व भारत माता की जय यांचे अर्थ फार व्यापक आहेत. यातील काही गोष्टी कायद्याने सुधारता येणार नाहीत त्यासाठी सामाजिक बदल होणे अपेक्षित आहे.’

सरकारवर काँग्रेस व विरोधी पक्षांनी देशाच्या विविध भागातील जमावाच्या हिंसाचार प्रकरणी टीका केली आहे. गृहमंत्रालयाच्या माहितीनुसार नऊ राज्यात एक वर्षांत ४० लोक जमावाच्या हिंसाचारात मारले गेले असून याबाबत निष्क्रियता दाखवल्याचा आरोप स रकारवर करण्यात आला आहे. गेल्या १७ जुलैला  सर्वोच्च न्यायालयाने झुंडीच्या हिंसाचाराची गंभीर दखल घेताना देशाचा कायदा पायदळी तुडवू दिला जाणार नाही असा इशारा दिला आहे. जमावाचा हिंसाचार व गोरक्षकांचा हिंसाचार याबाबत न्यायालयाने काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली तसेच केंद्राने या घटना हाताळण्यासाठी कायदा करावा अशी सूचनाही केली आहे.

नायडू म्हणाले की, ‘ निर्भयाप्रकरण घडले त्यावेळी निर्भया कायद्याची मागणी झाली तो कायदा करण्यात आला पण तसे प्रकार थांबले का , मला यातील राजकारणात जायचे नाही. प्रत्येक पक्ष त्यांच्या पद्धतीने प्रश्न  हाताळत असतो. मांडतही असतो. त्यात केवळ विधेयक, राजकीय इच्छाशक्ती, प्रशासकीय कौशल्य याने सगळे काम होत नाही. राष्ट्रवाद म्हणजे नेमके काय याची चर्चा झाली पाहिजे. त्याची स्पष्ट व्याख्या करा. माझ्या मते राष्ट्रवाद किवा भारत माता की जय म्हणजे १३० कोटी लोकांसाठीचा जय होचा जयघोष आहे. जात, वंश, लिंग, धर्म, प्रदेश यावर आधारित भेदभाव हा राष्ट्रवादाच्या विरोधात जाणारा आहे.’

निर्भया प्रकरणात १६-१७ डिसेंबर २०१२ च्या रात्री दक्षिण दिल्लीत एका बसमध्ये मुलीवर क्रूरपणे सामूहिक बलात्कार करण्यात आला होता नंतर तिला उपचारासाठी सिंगापूरला हलवण्यात आले असता तिचे २९ डिसेंबर २०१२  रोजी निधन झाले. त्या मुलीचे नाव नंतर निर्भया देण्यात आले.

मोदींच्या नेतृत्वाखाली नेत्रदीपक प्रगती – नायडू

शिकागो : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या चार वर्षांत देशाने नेत्रदीपक प्रगती केली असून सगळे जग भारताकडे आशेने पाहत आहे, असे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी तेलुगु अमेरिकी लोकांच्या मेळाव्यात सांगितले. ते म्हणाले, की सगळ्या जगाची अर्थव्यवस्था मंदावली असताना भारताची अर्थव्यवस्था मात्र वेगाने वाढते आहे. अलिकडे देशाच्या आर्थिक विकासाचे जे आकडे आले आहेत, जागतिक बँक, नाणेनिधी व आशियायी विकास बँक यांनी भारताविषयी जे आर्थिक अंदाज दिले आहेत, ते आशादायी आहेत यात शंका नाही. सगळे जग भारताकडे पाहत आहे. जेव्हा मी अगदी आतापर्यंत शहर विकासमंत्री होतो, त्या वेळी ३५ ते ४० राजदूतांनी भेटून भारतात गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्ती केली होती. आर्थिक सुधारणांबाबत मतैक्य होते आहे. नायडू हे अनधिकृत भेटीवर अमेरिकेत आले असून त्यांनी तेलगु समाजाला सांगितले, की भारताच्या विकास कथेत तुम्ही सहभाग द्या. शिकागो येथील अनेक तेलगु गटांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.