नवी दिल्ली : सध्याच्या काळात दहशतवाद हे मोठे प्रादेशिक आव्हान असून त्यावर मात केल्यास आर्थिक क्षेत्रासह अनेक क्षेत्रातील खरे सामर्थ्य समोर येईल, असे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी म्हटले आहे.

शांघाय सहकार्य संघटनेच्या आभासी अधिवेशनात त्यांनी सांगितले,की सीमेपलीकडून पसरवला जाणारा दहशतवाद धोकादायक आहे. कुठल्याही प्रकारच्या दहशतवादाचा सामूहिक दृष्टिकोन ठेवून मुकाबला केला पाहिजे.

पाकिस्तानकडे स्पष्ट संकेत करताना नायडू यांनी सांगितले,की काही देश दहशतवादाचा वापर धोरण म्हणून करीत आहेत. दहशतवाद विशेष करून सीमेपलीकडून पसरवला जाणारा दहशतवाद ही मोठी चिंतेची बाब आहे. दहशतवादाचा धोका नष्ट केला तर या भागातील आर्थिक व इतर क्षेत्रातील खरी सामथ्र्ये प्रत्ययास येतील. शांघाय सहकार्य संघटनेच्या अधिवेशनाचे यजमानपद प्रथमच भारताकडे असून २०१७ मध्ये भारत या गटाचा सदस्य झाला होता.

पाकिस्तानवर अप्रत्यक्ष टीका करताना नायडू यांनी सांगितले,की या संघटनेच्या मंचावर द्विपक्षीय प्रश्न उपस्थित करण्याची खोड काही देशांना आहे. ते संघटनेची तत्त्वे व निकष यांचे उल्लंघन आहे.

सप्टेंबरमध्ये भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी शांघाय सहकार्य संघटनेच्या संरक्षण अधिकाऱ्यांच्या आभासी बैठकीतून पाकिस्तानच्या प्रतिनिधींनी काश्मीर त्यांच्या नकाशात दाखवल्याचा निषेध म्हणून तडकाफडकी सभात्याग केला होता. भारताने पाकिस्तानवर वेळोवेळी विविध संघटनांच्या बैठकीतील नियम व संकेतांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे.