अर्थमंत्री अरूण जेटली यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर टीका करणाऱ्या काँग्रेसवर भाजपनेही निशाणा साधला आहे. काँग्रसेने देशात गरीब आणि श्रीमंतांमध्ये निर्माण केलेली दरी भरून काढण्याचा प्रयत्न मोदी सरकार करत आहे. मग त्यांना हा अर्थसंकल्प कसा आवडेल, असा उपहासात्मक प्रतिसवाल केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी केला आहे. अर्थसंकल्पावर काँग्रेससह विरोधी पक्षांनी टीकेची झोड उठवली आहे. त्याचा समाचार नायडू यांनी घेतला.

ते म्हणाले, राहुल गांधी आणि ममता बॅनर्जी या आपल्या पक्षाच्या धोरणानुसार बोलत आहेत. ते साहजिकच आहे. आम्ही अर्थसंकल्पावर चर्चा करण्यास तयार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांच्यातील आघाडीबाबतही त्यांनी भाष्य केले.
दोघे (काँग्रेस व समाजवादी पक्ष) एकत्र राहतील आणि एकत्रच बुडणार असल्याचा टोला लगावला. आम्ही तर बुडणार आहोत. आता यांनाही घेऊन बुडू, असा काँग्रेसने विचार केला असेल अशी टीका त्यांनी या वेळी केली.
अर्थमंत्री अरूण जेटली यांनी देशातील १० आर्थिक क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले आहे. मी या अर्थसंकल्पाला ‘दश्वमेध यज्ञ’ अशी उपमा देईल असेही ते म्हणाले.