देशामध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेत आरोग्य सुविधांची कमतरता जाणवत असतानाच दुसरीकडे उत्तर प्रदेश आणि पंजाबमधील काही रुग्णालयांमध्ये पीएम केअर्सच्या निधीमधून देण्यात आलेले शेकडो व्हेंटिलेटर्स न वापरताच पडून असल्याचं चित्र दिसत आहे. सदोष व्हेंटिलेटर्सबरोबरच हे व्हेंटिलेटर्स वापरण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आलेले कर्मचारी नसल्याने अनेक रुग्णालयांमध्ये साथीच्या काळामध्ये व्हेटिलेटर्स पडून असल्याचं चित्र दिसत आहे.

उत्तर प्रदेशमधील अनेक जिल्हा रुग्णालयांमध्ये पीएम केअर्स अंतर्गत देण्यात आलेले अनेक व्हेंटिलेटर्स न वापरताच धूळ खात पडून आहेत. करोना कालावधीमध्ये व्हेंटिलेटर्सची सर्वाधिक गरज असतानाच शेकडो व्हेंटिलेटर्स रुग्णालयामध्ये न वापरताच ठेवल्याचं चित्र दिसत आहे. हे व्हेंटिलेटर्स अनेक रुग्णालयांच्या स्टोअर रुममध्ये ठेवण्यात आले आहेत.

७५ व्हेंटिलेटर्स वर्षभरापासून धूळ खात

फिरोजाबाद मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आलेले ७५ व्हेंटिलेटर्स वर्षभरापासून धूळ खात पडले आहेत. १९० व्हेंटिलेटर्स पीएम केअर्सच्या निधीमधून विकत घेण्यात आले होते. त्यापैकी केवळ ३९ व्हेंटिलेटर्स वापरण्यात आले. रुग्णालयातील मुख्य आरोग्य अधिकारी असणाऱ्या अलोक शर्मा यांनी एनडीटीव्हीला दिलेल्या माहितीनुसार ५० व्हेंटिलेटर्स लखनऊला पाठवण्यात आले आहेत. १५ व्हेंटिलेटर्स अलहाबाद तर १० आग्रा येथील रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले आहेत.

आणखी वाचा- उत्तर प्रदेश : मृतांची संख्या इतकी की लाकडंही कमी पडू लागल्याने गंगेच्या किनाऱ्यावर दफन केले जातायत मृतदेह

बलियामध्ये व्हेंटिलेटर्स आहेत पण कर्मचारी नाहीत

बलिया येथे पाठवण्यात आलेले २९ व्हेंटिलेटर्स हाताळण्यासाठी प्रशिक्षण असणारे कर्मचारी उपलब्ध नसल्याने व्हेंटिलेटर्स पडून आहेत. उत्तर प्रदेशमधील मंत्री उपेंद्र तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ व्हेंटिलेटर्स बसंतपूरमध्ये आहेत. ११ व्हेंटिलेटर्स जिल्हा रुग्णालयामध्ये आधीच्या समाजवादी पक्षाच्या कार्यकाळापासून आहेत.

कौशांबीमध्ये खासगी रुग्णालयांकडून वापर पण…

कौशांबीमध्येही २४ व्हेंटिलेटर्स पाठवण्यात आले होते. यापैकी १५ खासगी रुग्णालयांना पाठवण्यात आले तर ९ व्हेंटिलेटर्स न वापरताच धूळ खात पडून आहेत. हे व्हेंटिलेटर्स वापरण्यासाठी योग्य प्रशिक्षण असणारे कर्मचारी नसल्याने त्यांचा वापर झालेला नाही. आम्ही यासंदर्भात लवकरात लवकर योग्य तो निर्णय घेऊ असं राज्याचे उपमुख्यमंत्री केशव मौर्य यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.

आणखी वाचा- “आम्हाला कामचोर, बावळट म्हटलं जातं”; CMO वर आरोप करत UP मधील डॉक्टरांचा सामूहिक राजीनामा

२५ व्हेंटिलेटर्सपैकी १८ सदोष

लखीमपुर खेरी येथील करोना रुग्णालयामध्ये व्हेंटिलेटर्सबद्दलचा असाच बेजबाबदारपणा दिसून येत आहे. पाठवण्यात आलेल्या २५ व्हेंटिलेटर्सपैकी १८ सदोष आहेत. अलीगढमधील दिनदयाल रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलेल्या ६० व्हेंटिलेटर्सपैकी ५० काम करत नसल्याचं सांगण्यात आलं आहे. यासंदर्भात माजी मंत्री दलवीर सिंह यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्रही लिहिलं आहे.

पंजाबमध्ये व्हेंटिलेटर्स झालाय राजकारणाचा विषय

पंजाबमधील फरदीकोट येथे अशाच प्रकारे व्हेंटिलेटर्स न वापरता धूळ खात पडल्याचं दिसत आहे. बाबा फरीद विद्यापीठाचे कुलगुरु असणाऱ्या राज बहादूर यांनी आता आमच्याकडे ४२ व्हेंटिलेटर्स असल्याची माहिती दिली आहे. आम्हाला पीएम केअर्सकडून ८२ व्हेंटिलेटर्स मिळाले होते. मात्र त्यापैकी ६२ व्हेंटिलेटर्स सदोष आहेत. पंजाबमधील या व्हेंटिलेटर्स विषयावरुन राज्य विरुद्ध केंद्र असा वाद सुरु झाला असून दोन्हीकडून केवळ पत्रव्यवहार सुरु असल्याचं चित्र दिसत आहे. या व्हेंटिलेटर्सच्या विषयावरुन केंद्र आणि राज्य सरकार एकमेकांवर बेजबाबदारपणाचा आरोप करताना दिसत आहे.