जवळपास पाच शतकांचे अथक प्रयत्न, अनेक अडथळे, अनेकांचे बलिदान अशा अखंड संघर्षांनंतर सत्य आणि न्यायाचा विजय झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा हिंदू समाजाला मिळणाऱ्या न्यायाची सुरुवात असून, आता लक्ष्य फक्त राम मंदिर उभारणी हेच असेल, असे मत विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आलोक कुमार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

काशी आणि मथुराचा विषय सध्या विहिंपच्या अजेंडय़ावर नाही. अयोध्येत राम मंदिर बांधणे हे समाजजागृतीच्या महत्त्वाच्या कार्याचा प्रारंभ ठरेल. सांस्कृतिक जागृती आता सुरू होत असल्याचे आलोक कुमार म्हणाले. केंद्र आणि राज्य सरकारने लवकरात लवकर राम मंदिर उभारण्याची प्रक्रिया हाती घ्यावी. मंदिरासाठी लागणारे ५० टक्के खांब तयार आहेत. मंदिर उभारणीत त्यांचा वापर केला जाईल, असेही आलोक कुमार म्हणाले.

हिंदू समाज जगभर पसरलेला असून तो शांतताप्रिय आहे. तो नेहमीच मर्यादेतच वागतो. गेली ७० वर्षे हा समाज या निकालाची वाट पाहत होता. सलग ४० दिवस सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सर्व वाद आणि अडथळे आणण्याचे सर्व प्रयत्न होऊनही न्यायालयाने राम मंदिर बांधण्याचा मार्ग खुला केला. या निकालाने जगभरातील हिंदू समाजाला आनंद झाला आहे, असे आलोक कुमार म्हणाले.

भारतीय पुरातत्त्व विभागाच्या निर्विवाद तंत्रपद्धीचा वापर आणि विभागाचे अथक परिश्रम यांचे न्यायालयाने एकमताने दिलेल्या निकालात मोठे योगदान आहे. न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान वाद संपुष्टात येण्यासाठी योगदान देणारे इतिहासाचे अभ्यासक आणि तज्ज्ञांचेही आलोक कुमार यांनी आभार मानले.