२०५० सालापर्यंत भारत हा सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्या असलेला देश राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आल्याच्या पाश्र्वभूमीवर, देशातील ‘लोकसंख्येचा असमतोल’ दूर करण्याकरता देशात सर्वासाठी समान कायदा लागू करण्यात यावा, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे. यासाठी हिंदूंनी मुस्लिमांइतकीच मुले जन्माला घालावीत, असे आवाहनही संघटनेने केले आहे.
आणखी ३५ वर्षांनी भारत इंडोनेशियाला मागे टाकून जगात सगळ्यात मुसलमान असलेला देश होईल, असा अहवाल अमेरिकेतील प्यू रिसर्च सेंटरने प्रसिद्ध केला आहे. या मुद्दय़ाकडे आपण गांभीर्याने लक्ष न दिल्यास भारत हाही काश्मीर, पाकिस्तान किंवा अफगाणिस्तान यासारखा मुस्लीमबहुल देश होईल, असा इशारा विहिंपचे सहसचिव सुरेंद्र जैन यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिला. भारताच्या लोकसंख्याविषयक रचनेत ‘असमतोल’ राहू नये यासाठी हिंदूंनी एकाहून जास्त मुलांना जन्म द्यावा, असे आवाहन संघटनेचे आंतरराष्ट्रीय सरचिटणीस चंपत राय यांनी शुक्रवारी केले होते.
हिंदूंनी आपली लोकसंख्या वाढवणे किंवा देशात समान नागरी कायदा लागू केला जाणे या दोनच मार्गानी लोकसंख्येचा असमतोल दूर केला जाऊ शकतो. पण या देशाची धर्मनिरपेक्षतेच्या नावावर दिशाभूल केली जात आहे. संपूर्ण भारत हा काश्मीर, पाकिस्तान किंवा अफगाणिस्तान होऊ द्यायचा आहे काय, असा प्रश्न मी कथित धर्मनिरपेक्षतावाद्यांना विचारू इच्छितो, असे जैन म्हणाले.  राममंदिराचा मुद्दा विहिंपच्या अजेंडय़ावर असून, सरकारने या मंदिराच्या बांधकामातील सर्व अडथळे दूर करावेत, असे आवाहन करतानाच, अनावश्यक विलंब झाल्यास हिंदूंचा संयम सुटू शकेल, असा इशारा जैन यांनी दिला. समान नागरी कायद्याची मागणी जातीयवादी आहे असे कुणाला वाटत असेल, तर तोच खरा जातीयवादी आहे. असा लोकांनी भारत सोडून पाकिस्तान किंवा अफगाणिस्तानात जावे, असे जैन म्हणाले.