ऐंशीच्या दशकात अयोध्येतील वादग्रस्त रामजन्मभूमी आंदोलनात आक्रमक कार्यशैलीमुळे प्रसिद्धीस आलेले विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल यांचे मंगळवारी दुपारी एका खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते.
सिंघल यांना शनिवारी श्वसनास त्रास होऊ लागल्याने मेदांता मेडिसिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. महिनाभरापासूनच ते श्वसनविकाराने ग्रस्त होते. प्रकृती खालावल्यानंतर त्यांना अलाहाबादमधून विशेष हवाई रुग्णवाहिकेद्वारे राजधानीत आणण्यात आले होते. त्यांच्या हृदयक्रियेत बिघाड झाला होता. न्यूमोनियाचे निदान झाल्यानंतर त्यांना अतिदक्षता विभागात ठेवले होते. १४ नोव्हेंबरपासून ते कृत्रिम श्वसनयंत्रणेवरच होते.

विहिंपला आंतरराष्ट्रीय रूप देणारा संघटक!
नवी दिल्ली : धातुशास्त्रातील पदवी, पं. ओंकारनाथ ठाकूर यांच्याकडून घेतलेले शास्त्रीय संगीताचे धडे असे कला व ज्ञानाचे अस्तर लाभलेले अशोक सिंघल यांनी सर्व आयुष्य संघकार्य आणि विश्व हिंदू परिषदेच्या विस्तारासाठी वाहून घेतले होते. विहिंपला आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकाश्रय मिळवून देण्यात आणि त्याद्वारे आर्थिक पाया भक्कम करण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
आग्रा शहरापासून जवळ असलेल्या अतरौली येथे २७ सप्टेंबर १९२६ रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील सरकारी नोकरीत होते. १९४२ पासून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित होते. सिंघल यांनी बनारस हिंदू विद्यापीठातून धातुशास्त्र विषयात पदवी घेतली होती. पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते संघाचे पूर्ण वेळ प्रचारक बनले. अविवाहित राहिलेल्या सिंघल यांनी उत्तर प्रदेश, दिल्ली व हरियाणाच्या वेगवेगळ्या भागांत काम केले. १९८० मध्ये ते विश्व हिंदू परिषदेचे सहसचिव बनले. कारसेवक म्हणून त्यांनी डिसेंबर १९९२ मध्ये बाबरी मशीदविरोधी वादग्रस्त मोहिमेत आक्रमक भूमिका पार पाडली होती. त्यांनी आपल्या आक्रमक कार्यशैलीद्वारे राम मंदिर चळवळीच्या माध्यमातून विश्व हिंदू परिषदेला महत्त्वाचे स्थान प्राप्त करून दिले. तसेच जगभर शाखा उघडून व समर्थक गोळा करून संघटनेला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचाही प्रयत्न केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त करून सिंघल यांच्या निधनामुळे आपली व्यक्तिगत हानी झाल्याचे सांगितले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल, हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, झारखंडचे मुख्यमंत्री रघुबर दास यांच्यासह अनेक नेत्यांनी सिंघल यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

रालोआ घटक पक्षांची बैठक बुधवारी होणार होती, मात्र सिंघल यांच्या अंत्यसंस्कारासाठी सरकारमधील ज्येष्ठ मंत्री उपस्थित राहणार असल्याने ही बैठक रद्द करण्यात आली आहे.