आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आलेल्या विश्व हिंदू परिषदेच्या साध्वी सरस्वतीविरोधात FIR दाखल करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या एका कार्यक्रमात साध्वी सरस्वती ने वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप तिच्यावर आहे त्याचप्रकरणी ही FIR दाखल करण्यात आली आहे. २८ एप्रिलला केरळमध्ये एका हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनात बोलताना साध्वी सरस्वतीने लव्ह जिहादला प्रोत्साहन देणाऱ्यांना कापून काढण्यासाठी हिंदूंनी तलवारी बाळगाव्यात असे वक्तव्य केल्याचा आरोप तिच्यावर आहे.

एवढेच नाही तर साध्वी सरस्वतीने गोहत्या करणाऱ्यांविरोधातही हिंदूंनी तलवार जवळ बाळगावी असे म्हटल्याचा आरोप आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मधुर गावाच्या शाहुल नावाच्या एका माणसाने साध्वी सरस्वती विरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी एफआयआर दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. बडियाडुक्की या ठिकाणी साध्वी सरस्वतीने लोकांच्या धार्मिक भावना भडकतील अशी वक्तव्ये केल्याचा आरोप होतो आहे. या कार्यक्रमाचे आयोजन विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने केले होते अशीही माहिती मिळते आहे.

साध्वी सरस्वती आणि वादग्रस्त वक्तव्य हे जणू काही समीकरणच आहे. दोन वर्षांपूर्वी भोपाळ या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात हिंदू मुलांनी मुस्लिम मुलांपासून दूर रहावे त्यांच्याशी मैत्री करू नये. जर कोणीही मुस्लिम मुलगा तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो तर त्याच्यावर तुम्ही दगडफेक करावी असेही म्हटले होते असा आरोप आहे. आता लव्ह जिहाद प्रकरणाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे साध्वी सरस्वतीच्या अडचणी वाढल्या आहेत.

मध्यंतरीच्या काळात भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशात तणाव वाढला होता. तेव्हा एका जवानाच्या तोंडी असलेली कविता ‘कश्मीर तो होगा मगर पाकिस्तान नहीं होगा’ सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली होती. मात्र सर्वात आधी ही कविता साध्वी सरस्वतीने आपल्या कार्यक्रमात म्हटली होती अशीही माहिती समोर येते आहे. हिंदू आणि मुस्लिम या दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करणारी वक्तव्ये साध्वी सरस्वतीने आत्तापर्यंत वारंवार केली आहेत. आता तिच्या विरोधात एफआयआर दाखल झाल्याने तिच्या अडचणींमध्ये भर पडली आहे.