पंतप्रधानपदासाठी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे नाव भारतीय जनता पक्षाने घोषित करावे, असा दबाव राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून येत आहे. त्यांच्या नावाची घोषणा पंतप्रधानपदासाठीचे उमेदवार म्हणून करावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने रविवारी केली आहे. मात्र मोदी यांचे या सर्वोच्च पदासाठीचे नाव आपल्याला मान्य होण्याजोगे नाही, अशी प्रतिक्रिया जनता दल संयुक्तने तातडीने व्यक्त केली. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या समर्थकांनी त्यांच्या उमेदवारीला कडाडून विरोध व्यक्त केला आहे.
‘मोदी हे अतिशय सक्षम आणि लोकप्रिय नेते आहेत,’ असे वक्तव्य भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी रविवारी केल्याने या चर्चेला वेग आला. मात्र, त्याच वेळी या टप्प्यात राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पंतप्रधान म्हणून मान्य होईल, असा नेता निवडणे अवघड असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अटलबिहारी वाजपेयींसारखा सर्वमान्य नेता मिळणे
अवघडच असल्याची कबुली त्यांनी दिली. पक्षाचे संसदीय मंडळ यासंदर्भात निर्णय घेईल, अशी माहिती त्यांनी दिली. विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल यांनी गेल्या आठवडय़ात संघ आणि भाजप नेत्यांशी चर्चा केली. त्यांनी रविवारी मोदी यांच्याबाबत उघडपणे मागणी केली. ते म्हणाले, ‘‘मोदी यांचा विचार पंतप्रधानपदासाठी
व्हावा, अशी मागणी लोकांमधूनच होत आहे. भाजपलाही त्यावर विचार करावा लागेल. मोदी हे पक्षातील सर्वाधिक लोकप्रिय नेते आहेत, असे मत पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह यांनीच व्यक्त केले आहे. मोदी यांची भाजपने पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून निवड करावी, असा ठराव करून संकेतांचा भंग मात्र आम्ही करणार नाही.’’दरम्यान, विहिंप आणि काही हिंदू धार्मिक गट मोदी यांच्या पंतप्रधानपदाबाबतच्या उमेदवारीबाबत अलाहाबाद येथे चालू असलेल्या कुंभमेळ्यात ५ व ६ फेब्रुवारी रोजी चर्चा करणार असल्याचे समजते. राजनाथ सिंह हे ६ फेब्रुवारीस कुंभमेळ्यास भेट देणार आहेत. या भेटीबाबत विविध तर्कवितर्क करण्यात येत आहेत. त्या वेळी तेथे मोदी हेदेखील उपस्थित राहणार असल्याची चर्चा आहे. मात्र, त्यांचा अधिकृत कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही.
पंतप्रधानपदाच्या उमेदवाराबाबतचा निर्णय राजकीय पक्षांकडून घेतला जातो. हा निर्णय साधू आणि धार्मिक आखाडे कसा घेऊ शकतात, ते मला समजू शकत नाही. धार्मिक नेत्यांनी असे निर्णय घेणे ही दिवाळखोरी आहे.
– शिवानंद तिवारी, प्रवक्ते, जनता दल (संयुक्त)
आमचा आघाडी मोडण्यावर विश्वास नाही. पंतप्रधानपदाच्या उमेदवाराबाबत पक्ष निर्णय घेऊन योग्य वेळी नेत्याचे नाव जाहीर करेल.
– मुख्तार नक्वी,
उपाध्यक्ष, भाजप समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यांचे नाव भावी पंतप्रधान म्हणून प्रादेशिक पक्षांना मान्य आहे. आम्ही या पक्षांशी संपर्क साधून आहोत. मुलायम
यांचे नाव सर्वमान्य होण्यासारखे आहे, .
– रामाश्रय खुशवाह, प्रवक्ते, समाजवादी पक्ष