उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीचे (यूपीए) उमेदवार गोपाळकृष्ण गांधी यांच्यावर शिवसेनेने टीकेचे बाण सोडले आहेत. पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल गोपाळकृष्ण गांधी यांनी याकूब मेमनला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले होते, अशी व्यक्ती उपराष्ट्रपतीपदावर कशाला हवी असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे.

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत काँग्रेसने गोपाळकृष्ण गांधी यांना उमेदवारी दिली आहे. गोपाळकृष्ण गांधी हे महात्मा गांधी यांचे नातू असून ते पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल आहेत. गोपाळकृष्ण गांधी यांच्या उमेदवारीवर शिवसेनेने आक्षेप घेतला आहे. गोपाळकृष्ण गांधी यांनी १९९३ मधील बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमनला फाशीची शिक्षा होऊ नये यासाठी प्रयत्न केले होते याकडे संजय राऊत यांनी लक्ष वेधले. गोपाळकृष्ण यांचे आडनाव गांधी असल्याने त्यांना समर्थन देता येणार नाही. याकूबच्या फाशीला विरोध करणारे गांधी तुम्हाला उपराष्ट्रपतीपदी चालतील का असा सवाल त्यांनी विचारला. अशा व्यक्तीला उमेदवारी देणाऱ्यांचे मानसिक संतुलन तपासावे असा टोलाही त्यांनी काँग्रेसला लगावला. सोनिया गांधी यांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूक म्हणजे संकुचित दृष्टीकोन आणि धर्मांध शक्तीविरोधातील लढा असल्याचे म्हटले होते. याचा समाचार घेताना राऊत म्हणाले, संकुचित दृष्टीकोनाची व्याख्या काय आहे हे सोनिया गांधींनी सांगावे. त्यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची चिंता करु नये. रामनाथ कोविंद यांचा विजय निश्चित आहे असा दावाही राऊत यांनी केला.

मुंबईतील १९९३ मधील बॉम्बस्फोट प्रकरणात याकूब मेमनला फाशीची शिक्षा झाली होती. याकूबला फाशी देण्यास गोपाळकृष्ण गांधींनी विरोध दर्शवला होता. त्यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना पत्र लिहून फाशी रद्द करण्याची मागणी केली होती.