19 November 2017

News Flash

एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार व्यंकय्या नायडू?

उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक ५ ऑगस्ट रोजी होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे

नवी दिल्ली | Updated: July 17, 2017 1:48 PM

venkaiah naidu : देशाचे नवे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू

राष्ट्रपतीपदाची निवडणूक सुरू असतानाच आता उपराष्ट्रपतीपदी कोण बसणार याचीही चर्चा जोर धरू लागली आहे. लोकसत्ता ऑनलाईनच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी व्यंकय्या नायडू, द्रौपदी मुरमू आणि महाराष्ट्राचे राज्यपाल सी विद्यासागर राव या तिघांची नावं चर्चेत आहेत. इतकंच नाही तर या तिघांपैकी व्यंकय्या नायडू यांचं नाव सर्वाधिक चर्चेत आहे. त्यामुळे एनडीएकडून व्यंकय्या नायडू यांच्या नावावरच शिक्कामोर्तब होऊ शकतं अशी चर्चा आहे. आज संध्याकाळी भाजप आणि एनडीएच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे या बैठकीत उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे.

यूपीएनं गोपाळकृष्ण गांधी यांचं नाव उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केलं आहे. याकूब मेमनच्या फाशीला गांधी यांनी विरोध केला होता. गोपाळकृष्ण गांधी हे पश्चिम बंगालचे राज्यपाल आहेत. त्यांना काँग्रेससह १८ इतर पक्षांनी पाठिंबा दिलेला आहे. उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक ५ ऑगस्टला होणार आहे. त्याच दिवशी मतदान होईल आणि त्याचदिवशी मतमोजणीही केली जाणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख १८ जुलै आहे.

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतही एनडीएचीच सरशी होण्याची शक्यता आहे कारण त्यांच्याकडे संख्याबळ जास्त आहे. असं असलं तरीही काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनीही या मतदानासाठी कंबर कसली आहे.

व्यंकय्या नायडू, द्रौपदी मुरमू आणि सी विद्यासागर राव या तिघांची नावं एनडीएकडून पुढे आली आहेत. या रेसमध्ये सर्वात पुढे व्यंकय्या नायडू आहेत अशी माहिती समोर आली आहे. व्यंकय्या नायडू हे मोदी सरकारमध्ये शहर विकास मंत्री आहेत. वाजपेयींच्या काळात त्यांच्याकडे ग्रामविकास खातं होतं. आता उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे उमेदवार म्हणून त्यांचं नाव चर्चेत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे धक्कातंत्रासाठी प्रसिद्ध आहेत. राष्ट्रपतीपदासाठी नाव जाहीर करताना रामनाथ कोविंद यांचं नाव चर्चेत नसताना अचानक एनडीएनं त्यांचं नाव जाहीर करून टाकलं. आता उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा अर्ज भरण्याच्या तारखेला अवघा एक दिवस उरलेला असताना संध्याकाळी हे नाव जाहीर केलं जाणार आहे.

First Published on July 17, 2017 1:48 pm

Web Title: vice president election venkaiah naidu top in race vidyasagar rao draupadi murmu are also in race