News Flash

बलात्काराचा खोटा आरोप करणं तरुणीला भोवलं; जन्माला आलेल्या बाळामुळे फुटले बिंग

डीएनए चाचणी केल्यानंतर समोर आलं सत्य

प्रातिनिधीक छायाचित्र

सात वर्षांपासून बलात्काराच्या आरोपाला सामोरं जाणाऱ्या एका तरुणाला अखेर न्याय मिळाला. एका तरुणीने केलेल्या बलात्काराच्या आरोपाचं बिंग सात वर्षांनंतर फुटले. त्यानंतर बलात्काराचा खोटा आरोप करणाऱ्या तरुणीला न्यायालयानं अद्दल घडवत तरुणाला १५ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. चेन्नईतील एका न्यायालयानं हे आदेश दिले आहेत.

संतोष असं बलात्काराचा आरोप करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. संतोषच्या आईवडिलांनी त्याचा विवाह एका मुलीशी निश्चित केला होता. मात्र, संपत्तीच्या वादातून त्यांच्या कौटुंबिक नातेसंबंध बिघडले आणि ते वेगळे झाले. त्यानंतर संतोषने एका अभियांत्रिकी महाविद्यालयातून शिक्षण घेणं सुरू केलं. इंजिनिरिंगचं शिक्षण सुरू केलेलं असतानाच आपली मुलगी गर्भवती असल्याचं लग्न मोडलेल्या तरुणीच्या आईने संतोषच्या पालकांना सांगितलं. त्याचबरोबर तातडीने त्यांचा विवाह करून देण्याची मागणीही केली.

सदरील तरुणीशी शारीरिक संबध ठेवल्याचा आरोप संतोषने फेटाळून लावला. त्यानंतर तरुणीसह तिच्या कुटुंबीयांनी संतोषविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी संतोषला अटक केली. त्याला न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर संतोषला ९५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर १२ फेब्रुवारी २०१० रोजी संतोषला जामीन मिळाला.

जामीन मिळाल्यानंतर खटला चालू असतानाच बलात्काराचा आरोप केलेल्या तरुणीने बाळाला जन्म दिला. या बाळाची डीएनएची तपासणी करण्यात आली. त्यातून संतोष त्या बाळाचा बाप नसल्याचं समोर आलं. त्यानंतर सात वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकरणात महिला न्यायालयानं संतोषची १० फेब्रुवारी २०१६ रोजी निर्दोष सुटका केली.

बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष सुटका झाल्यानंतर संतोषनं सदरील तरुणी व तिच्या कुटुंबीयांविरुद्ध नुकसान भरपाईची मागणी करणारी याचिका दाखल केली. संतोषनं नुकसानीपोटी ३० लाख रुपयांची मागणी केली. तरुणीने केलेल्या बलात्काराच्या खोट्या आरोपामुळे माझं करिअर उद्ध्वस्त झाल्याचा आरोप संतोषनं नुकसान भरपाई मागताना केला. या प्रकरणात निकाल देताना चेन्नईतील न्यायालयानं संतोष १५ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश तरुणी व तिच्या कुटुंबाना दिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2020 11:30 am

Web Title: victim of false rape accusation awarded rs 15 lakh compensation by chennai court bmh 90
Next Stories
1 शंभर वर्षांपूर्वी चोरलेली अन्नपूर्णेची मूर्ती लवकरच भारतात
2 करोना नियंत्रणासाठी निर्णायक कृतीचे मोदी यांचे जागतिक नेत्यांना आवाहन
3 ..म्हणून खासगी रुग्णालयांकडून भरमसाट शुल्कआकारणी
Just Now!
X