दिल्ली सामूहिक बलात्कार आणि हत्याकांडातील चार आरोपींना राजकीय दबावाखाली फाशीची शिक्षा ठोठाविण्यात आली, या बचाव पक्षाच्या वकिलांनी काढलेल्या निष्कर्षांला पीडित युवतीच्या वडिलांनी तीव्र हरकत घेतली आहे. अशा प्रकारचा निष्कर्ष काढणे हा न्यायव्यवस्थेचा अवमान असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. आरोपींना राजकीय दबावाखाली फाशीची शिक्षा ठोठाविण्यात आल्याचा बचाव पक्षाच्या वकिलांचा निष्कर्ष हा न्यायव्यवस्थेला आव्हान देणारा आणि अवमान करणारा असल्याचे पीडित युवतीच्या वडिलांनी म्हटले आहे. असा निर्घृण प्रकार बचाव पक्षाच्या वकिलांच्या मुलीसोबत अथवा आप्तेष्टांसोबत घडला असता तरी त्यांनी उपरोक्त मतच व्यक्त केले असते का, असा सवालही त्यांनी केला आहे.
बचाव पथकाचा वकील वादाच्या भोवऱ्यात
‘‘माझी मुलगी जर रात्री उशिरापर्यंत आपल्या प्रियकरासोबत फिरत असेल किंवा तिने त्याच्यासोबत विवाहापूर्वीच लैंगिक संबंध प्रस्थापित केले असतील, तर मी तिला जिवंत जाळेन,’’ अशा प्रकारचे विधान करून दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणातील एका आरोपीचा वकील वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ‘दिल्ली बार कौन्सिल’ने त्याच्या या वादग्रस्त विधानाची गंभीर दखल घेतली असून, कारवाईचा इशारा दिला आहे. दिल्लीतील विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाल्यानंतर या प्रकरणातील एका आरोपीचे वकील ए. पी. सिंग यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना अशा प्रकारचे वादग्रस्त विधान केले. अनेक स्वयंसेवी संस्थांनी सिंग यांच्या या विधानावर नाराजी व्यक्त करीत बार कौन्सिलकडे तक्रार केली होती. ‘‘अनेक संस्थांनी तक्रारी केल्याने २० सप्टेंबर रोजी बार कौन्सिलची बैठक होणार असून, त्यात या मुद्दय़ावर चर्चा केली जाणार आहे. सिंग यांनी व्यावसायिक गैरवर्तन केले असून, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल,’’ असे बार कौन्सिलचे सचिव मुरारी तिवारी यांनी सांगितले.