अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या विदर्भातील शेतकऱ्यांना राष्ट्रीय आपत्ती निवारण कोषातून ९२१.९८ कोटी रुपयांची विशेष आर्थिक मदत देण्याचा निर्णय केंद्रीय उच्च स्तरीय समितीने गुरुवारी घेतला आहे. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार या समितीचे अध्यक्ष आहेत. आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुका पाहता विदर्भाला पहिल्यांदाच केंद्र सरकारने इतक्या मोठय़ा प्रमाणावर आर्थिक मदत घोषित केली आहे.
यंदा मान्सूनच्या उत्तरार्धात झालेल्या जोरदार पावसामुळे विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, नाशिक व यवतमाळ जिल्ह्य़ांत मोठे नुकसान झाले होते. अतिवृष्टीमुळे शेतीव्यतिरिक्त झालेल्या अन्य नुकसानासाठी केंद्रीय नियोजन आयोगाशी चर्चा करून स्वतंत्र निधी दिला जाईल, असे पवार यांनी स्पष्ट केले. अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून त्याबरोबरच काही ठिकाणी रस्ते आणि घरेही वाहून गेली आहेत. त्यासाठी आर्थिक पॅकेजची मागणी करणारा स्वतंत्र प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राकडे पाठविला आहे. गुरुवारच्या या बैठकीस केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.