संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी सोमवारी दिल्लीच्या जंतरमंतरवर विदर्भ संयुक्त कृती समितीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी दिवसभर उत्स्फूर्त धरणे दिले. या आंदोलनाला बोडोलँड पीपल्स फ्रंटचे खासदार एस. के. बैसिमुथियारी तसेच आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांचे समर्थन लाभले, पण भाजपचे राज्यसभा सदस्य अजय संचेती वगळता ‘कट्टर’ विदर्भवादी खासदारांनी या आंदोलन स्थळाकडे फिरकण्याचे टाळले.
दिवसभर चाललेल्या या आंदोलनात सहभागी होताना विदर्भवादी कार्यकर्त्यांमध्ये भरपूर उत्साह दिसला. आमदार अनिल बोंडे, माजी आमदार वामनराव चटप, एस. क्यू. जमा, डॉ. श्रीनिवास खांदेवाले, आशीष देशमुख, विलास काळे, प्रा. कमल भारद्वाज, रामेश्वर मोहबे, शंकर भोळे, तनहा नागपुरी, सप्तशीला आळे, प्रतिभा खापर्डे, सुषमा वडके, नंदा पराते, नानाभाई अस्लम, राम नेवले, अरुण केदार, दीपक निलावार, अहमद कादर, फिरोज खान, अशफाक अहमद, संजीव वानखेडे यांच्यासह विदर्भातून आलेले दुसऱ्या फळीतील शेकडो नेते व कार्यकर्ते सहभागी झाले होते. ‘वेगळा विदर्भ झालाच पाहिजे,’ अशा घोषणा देत आंदोलकांनी सकाळपासून सुरू झालेल्या पावसाला न जुमानता नेटाने दिवसभर भाषणे करीत आणि घोषणा देत स्वतंत्र विदर्भाच्या मागणीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला, पण संसदेच्या पावसाळी अधिवेशनानिमित्त दिल्लीत असलेले वेगळ्या विदर्भाचे खंदे समर्थक विलास मुत्तेमवार, दत्ता मेघे, विजय दर्डा आणि केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल आंदोलनस्थळी पोहोचून प्रोत्साहन देतील, ही आंदोलकांची अपेक्षा फोल ठरली. भाजपचे वैदर्भीय खासदार पुरामुळे आपापल्या मतदारसंघातच अडकून पडल्याने येऊ शकले नाहीत, असे संचेती यांनी आंदोलकांना सांगितले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. देवेंद्र फडणवीस मंगळवारी दिल्लीत येऊन वेगळ्या विदर्भाच्या मुद्दय़ावर सर्व संबंधितांची भेट घेणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. छोटय़ा राज्यांच्या मागणीला आम आदमी पार्टीचे तत्त्वत: समर्थन असल्याचे जाहीर करून केजरीवाल यांनी केंद्र सरकारने दुसऱ्या राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना करून सर्व छोटय़ा राज्यांच्या निर्मितीचे प्रस्ताव विचारात घ्यावे, अशी मागणी केली.  
२८ सप्टेंबपर्यंत केंद्र सरकारने वेगळ्या विदर्भाच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल आणि विदर्भाच्या सर्व जिल्ह्य़ांमध्ये नागपूर कराराची होळी करण्यात येईल, असा इशारा कृती समितीने दिला. स्वतंत्र विदर्भाची मागणी आपण पक्षाच्या व्यासपीठावर उपस्थित करणार असल्याचे नागपूरचे खासदार विलास मुत्तेमवार यांनी सांगितले. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्राचे आपल्याला अजून उत्तर मिळालेले नाही, असे ते म्हणाले. काँग्रेसचे विदर्भातील खासदार व नेते सोनिया गांधी यांना भेटून वेगळ्या विदर्भाकडे लक्ष वेधणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
वेगळ्या विदर्भाचे आंदोलन मूठभर नेत्यांपुरते मर्यादित असून ते जनतेत कुठेच दिसत नसल्याची टीका शिवसेनेचे राज्यसभेतील गटनेते संजय राऊत यांनी केली. मुत्तेमवार, मेघे, दर्डा आणि पटेल या संसद सदस्यांची वेगळ्या विदर्भासाठी त्याग करण्याची तयारी नसून वेळ आल्यास ते पळही काढतील, असा चिमटा राऊत यांनी काढला.