भारत-चीन सीमेवर डोकलाम येथे एक वर्षापूर्वी दोन्ही सैन्यांमध्ये सुरक्षेवरून वाद निर्माण झाला होता. त्यांच्यातील धुसफुसीच्या अनेक घटना माध्यमांमधून समोर येत होत्या. मात्र, आता या घटनेच्या एक वर्षानंतर एक सुखद घटना पहायला मिळाली आहे. यासंदर्भातील एक व्हिडिओ भारतीय लष्कराने प्रसारित केला असून यामध्ये भारत-चीनचे सैनिक संयुक्त युद्धाभ्यासादरम्यान पंजाबी गाण्यावर नृत्य करताना दिसत आहेत.


दोन्हीकडील सैनिकांचा वार्षिक सैन्य अभ्यास ‘हँड इन हँड’ चीनच्या चेंगडू येथे १०डिसेंबरपासून सुरू झाले असून २३ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. दरम्यान, लष्काराने आपल्या ट्विटरवरुन याचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. संयुक्त सैन्य अभ्यासाचा कठीण कार्यक्रम केल्यानंतरचे काही हलके फुलके क्षण असं या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

गेल्या वर्षी डोकलाम वादामुळे दोन्ही दोन्ही पक्षांमध्ये तणावाचे वातावरण होते. त्यामुळे दोन्ही देशांचे सैन्य एकमेकांसमोर उभे ठाकले होते.