भाजपा खासदार विनोदकुमार सोनकर यांची कार चुकून संसद भवनाच्या परिसरात गेट नंबर एक वर लावण्यात आलेल्या बूम बॅरियरला धडकली. ही घटना घडल्यानंतर तिथले सुरक्षा रक्षक तत्काळ अलर्ट झाले आणि त्यांनी आपल्या बंदुका या कारच्या दिशेनं रोखल्या. याचा व्हिडिओ एएनआयने ट्विट केला आहे.

संसद भवन परिसर अत्यंत संवेदनशील भाग असल्याने इथे सुरक्षा व्यवस्था कायमच अलर्ट मोडवर असते. सुरक्षा व्यवस्था भेदण्याचा जरासा जरी प्रयत्न झाला तर धोक्याची सुचना देणारा विशिष्ट अलार्म वाजतो त्यामुळे सुरक्षा रक्षक तत्काळ सावध होतात. त्याचीच प्रतीची आज संसद परिसरात सोनकर यांची कार धडकल्याने दिसून आली.

१३ डिसेंबर २००१ रोजी संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर इथली सुरक्षा व्यवस्था अधिकच कडक करण्यात आली आहे. या हल्ल्यामध्ये लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद या दोन पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनांचा सहभाग होता. या हल्ल्याचा सूत्रधार काश्मीरी दहशतवादी अफजल गुरु हा होता. या हल्ल्याच्या कटात दोषी आढळल्यानंतर त्याला ९ फेब्रुवारी २०१३ रोजी फाशी देण्यात आली होती.