राष्ट्रीय जनता दलाचे(राजद) अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना निवडणूक प्रचारादरम्यान एका अपघाताला सामोरे जावे लागले. बिहारच्या मोतीहारी जिल्ह्यात एका प्रचारसभेत लालूप्रसाद मंचावर बसलेले असताना मंडपाच्या छताला टांगलेला पंखा त्यांच्यावर कोसळला. सुदैवाने लालूप्रसाद यांना कोणतीही दुखापत झाली नाही. मंचाच्या छताला टांगलेल्या पंख्याच्या मार्गात मंडपाचा पडदा अडथळा निर्माण करत असल्याचे लालूप्रसाद यांच्या निदर्शनास आले होते. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना ते लक्षात आणून देण्याचाही प्रयत्न केला. इतक्यात तो पंखा लालूप्रसाद यांच्या हातावर कोसळला. मंचावर उपस्थित कार्यकर्त्यांनी तो पंखा त्वरित मंचावरून बाजूला सारला.