वॉशिंग्टन : अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची अध्यक्षपदावरून हकालपट्टी करावी कारण त्यांनी देशहितापेक्षा स्वत:चे हितसंबंध जपण्याचा प्रयत्न केला, असा जोरदार युक्तिवाद सिनेटमधील महाभियोग व्यवस्थापक व डेमोक्रॅटिक नेते अ‍ॅडम शिफ यांनी केला. अमेरिकी लोकांना त्यांचे हित जपणारा अध्यक्ष हवा आहे, तसा अध्यक्ष  त्यांना मिळालाच पाहिजे, असा दावा त्यांनी केला. तिसऱ्या दिवशी ट्रम्प यांच्याच काही सहकाऱ्यांच्या चित्रफिती सादर करून डेमोक्रॅटिक पक्षाने रिपब्लिकन पक्षास कोंडीत पकडले.

तिसऱ्या दिवशी डेमोक्रॅटिक पक्षाने ट्रम्प यांच्यावर आक्रमक हल्ला करताना त्यांनी २०२० च्या निवडणुकीतील प्रचारात मदतीसाठी युक्रेनवर कशा प्रकारे दबाव आणला याची कहाणी कथन केली. ट्रम्प यांच्यावर अध्यक्ष म्हणून विश्वास ठेवता येणार नाही कारण त्यांनी त्यांच्या हितासाठी काम केले आहे. ट्रम्प यांनी नेहमीच स्वहित जपले आहे, आताही ते हेच करीत आहेत. पूर्वीही हेच केले आहे, पुढील काही महिन्यातही ते हेच करणार आहेत. जर या सुनावणीत ते दोषी ठरले तर त्यांना पदावरून काढून टाकले पाहिजे. येथे सत्याचा प्रश्न आहे, सत्य जिंकले नाही तर तो आपल्या सर्वाचा पराभव असेल.

एकूण १०० सिनेटर्स या महाभियोगाच्या कारवाईत सहभागी झाले असून लाखो अमेरिकी लोक दूरचित्रवाणीवर हे कामकाज पाहत आहेत. तिसऱ्या दिवशी महाभियोग व्यवस्थापकांनी अनेक चित्रफितीाह कागदपत्रे सादर केली, त्यात ट्रम्प यांनी अधिकारांचा कशा प्रकारे गैरवापर केला हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला.

प्रक्रिया खोटारडेपणाची- ट्रम्प

दरम्यान, ट्रम्प यांनी ट्विट संदेशात म्हटले आहे, की ही सगळी प्रक्रिया खोटारडेपणाची आहे. अमेरिकी इतिहासात अतिशय अन्यायकारक व इतक्या भ्रष्ट पद्धतीने कधीच सुनावणी झाली नव्हती. दरम्यान शुक्रवारी डेमोक्रॅटिक पक्षाचे युक्तिवाद पूर्ण होत असून त्यात ट्रम्प यांनी पुरावे गोळा करण्यात काँग्रेसला कसे असहकार्य केले हा दुसरा मुद्दा त्यात चर्चेला आहे.