वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले उत्तर प्रदेशमधून निवडून आलेले भाजपचे खासदार साक्षी महाराज यांचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. पोलिसांच्या मारहाणीत जखमी झालेल्या एका मुलीला जखम दाखविण्यासाठी कपडे उतरवावे लागत असल्याचे घृणास्पद दृष्य या व्हिडीओमध्ये आहे. मुलीवर सर्वांसमोर जीन्स काढण्यासाठी दबाव आणण्यात येत असलेला हा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला असून, नेटकऱ्यांकडून साक्षी महाराजांवर टीका होत आहे.
मैनपुरी येथील भाजप कार्यकर्ता मैदान सिंहच्या घरावर २ मे रोजी पोलिसांनी छापा मारला होता. कच्ची दारू बनविण्याच्या आरोपाखाली पोलिसांनी त्याला अटक केली होती. पोलीस मैदान सिंहला अटक करून पोलीस ठाण्यावर घेऊन जात असताना ग्रामस्थांनी पोलिसांच्या जीपला घेराव घालून मैदान सिंहची सुटका केली. या दरम्यान ग्रामस्थ आणि पोलिसांमध्ये हाणामारी झाल्याचे माध्यमांतील वृत्तात म्हटले आहे. त्याच रात्री पोलिसांनी पुन्हा मैदान सिंहच्या घरावर छापा मारला. पोलिसांनी त्याच्या सर्व कुटुंबियांना पोलीस ठाण्यावर आणले. पोलिसांनी मैदान सिंहच्या कुटुंबियांना मारहाण केल्याचा आरोप असून, मैदान सिंह अद्याप फरार आहे.
साक्षी महाराजाना या घटनेबाबत समजताच ३ मे रोजी ते मैदान सिंहच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी मैनपुरीत दाखल झाले. या ठिकाणी त्यांनी एका मुलीची जीन्स उतरवून जखम पाहाण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर त्यांनी पोलिसांनादेखील धमकी दिली. प्रक्षोभक भाषण केल्याबद्दल त्यांच्या विरोधात पोलिसांनी तक्रार नोंदवली आहे.

व्हिडीओ –