जम्मू काश्मीरमधील पुँछ जिल्ह्यात सोमवारी पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या गोळीबारात दोन भारतीय जवान हुतात्मा झाले. पाक सैनिकांनी भारतीय जवानांच्या मृतदेहाची विटंबना केल्याने देशभरात पाकिस्तानविरोधात राग व्यक्त करून पाकच्या या कृत्याचा निषेध केला जात आहे. पुंछ येथे स्थानिक नागरिक आणि लष्करातील निवृत्त सैनिकांनी एकत्र येत पाकिस्तानविरोधात घोषणा दिल्या आहेत. देशासाठी प्राण अर्पण केलेल्या जवानांचे पार्थिव घेऊन जात असताना या लोकांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. ‘इंडियन आर्मी आगे बढो, हम तुम्हारे साथ है,’ अशा घोषणा हा समूह देत होता. या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.
या व्हिडिओत लष्कराचे माजी सैनिक आणि स्थानिक नागरिकांनी एकत्र येत पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. इंडियन आर्मी आगे बढो, हम तुम्हारे साथ है, असेही ते म्हणताना दिसतात. या वेळी हुतात्मा झालेल्या जवानांचे पार्थिव हेलिकॉप्टरमधून जम्मूला नेण्यात येत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे.

सोमवारी पाकिस्तानने केलेल्या गोळीबार आणि रॉकेट लाँचरच्या हल्ल्यात दोन भारतीय जवान हुतात्मा झाले होते. हुतात्मा झालेल्यामध्ये एक जेसीओ आणि सीमा सुरक्षा दलाचे हेड कॉन्स्टेबल यांचा समावेश होता. हल्ल्यानंतर पाकिस्तानने भारतीय जवानांच्या मृतदेहाची विटंबना केल्याचे भारतीय लष्कराने सांगितले. एक मे २०१७ रोजी कृष्णा सेक्टरमधील नियंत्रण रेषेजवळ दोन चौक्यांवर पाकिस्तानी सैनिकांनी रॉकेट लाँचर आणि गोळीबार केला. पाकिस्तानी सैनिकांनी भ्याड हल्ला करत आमच्या दोन जवानांच्या मृतदेहाची विटंबना केली, असल्याचे लष्कराच्या निवेदनात म्हटले आहे. त्याचबरोबर पाकिस्तानच्या या नृशंस कृत्याचे चोख प्रत्युत्तर देण्यात येईल, असा इशाराही यात देण्यात आला आहे. त्यानंतर रात्री उशिरा भारतीय सैनिकांनी केलेल्या कारवाईत पाकिस्तानच्या ७ सैनिकांना कंठस्नान घालून त्यांच्या दोन चौक्या उद्धवस्त करण्यात आल्या.