राम मंदिरावरुन काँग्रेसचे वरिष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. राजा दशरथाच्या महालात १० हजार खोल्या होत्या. त्यामुळे श्री राम कोणत्या खोलीत जन्माला आले कोणाला ठाऊक?, असे विधान त्यांनी केले आहे. दिल्लीत सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाद्वारा आयोजित ‘एक शाम बाबरी मस्जिद के नाम’ या कार्यक्रमात ते बोलत होते.


अय्यर म्हणाले, तुमची इच्छा आहे तर तुम्ही अयोध्येत राम मंदिर जरुर उभारा मात्र, मंदिर वही बनाएंगे असं आपण कसं म्हणू शकता. मंदिर वही बनाएंगे याचा अर्थ काय? ते पुढे म्हणाले, दशरथ मोठे राजा होते असं सांगितल जातं तसेच त्यांच्या महालात १० हजार खोल्या होत्या. त्यामुळे कोणाला सांगता येईल का की कोणती खोली कुठे होती. मात्र, आज आपला केवळ समज असल्याने आज उभी असलेली मशीद उध्वस्त करुन त्याठिकाणी राम मंदिर उभारायचं ठरवलंय. अय्यर यांच्या या वक्तव्यामुळे त्यांना सोशल मीडियावर ट्रोल व्हावे लागले आहे.

या कार्यक्रमात आपले विचार व्यक्त करताना त्यांनी इतरही अनेक गोष्टी सांगितल्या. ६ डिसेंबरचा दिवस या देशासाठी पतनाचा दिवस होता. ६ डिसेंबर १९९२ मध्ये जे काही झाले ते व्हायला नको होते, असे त्यांनी म्हटले आहे.

मणिशंकर अय्यर हे आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखले जातात. २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकांपूर्वी त्यांनी तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याविरोधात केलेल्या एका विधानावरून त्यांच्यावर मोठी टीका झाली होती. काँग्रेसच्या एका बैठकीत ते म्हणाले होते की, मोदी जर इकडे चहा विकायला आले तर काँग्रेस त्यांचे स्वागत करेन.