एखाद्या राज्यातील पर्यटन वाढावे यासाठी अनेकदा त्या राज्यातील सरकारमार्फत वृत्तपत्रांमध्ये किंवा टीव्हीवर जाहिराती केल्या जातात. मात्र अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील पर्यटनाला चालना मिळावी म्हणून एकदम भन्नाट कल्पना लढवली आहे. अरुणाचलचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी जास्तीत जास्त बुलेट रायर्सने राज्यामध्ये भटकंतीसाठी यावे असा संदेश देण्यासाठी स्वत: बुलेटवरुन १२२ किलोमीटरचा प्रवास केला. त्यांनी या प्रवासाचा व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे.

फोटोगॅलरी >> हा काही साधासुधा रायडर नाही हे तर आहेत मुख्यमंत्री

४० वर्षीय खांडू यांनी रॉयल एनफील्ड इंटरसेप्टर ६५० या बाईकवरुन यिंगकींग ते पासीघाट असा १२२ किलोमीटरचा प्रवास केला. या उपक्रमाच्या माध्यमातून जास्तीत जास्त पर्यटकांनी राज्यामध्ये यावे हा संदेश खांडू यांनी दिला. अरुणाचल हे साहसी खेळ आणि बाईक रायडर्ससाठी स्वर्ग असल्याचे म्हटले जाते. अरुणाचलमध्ये भटकंतीसाठी येण्याचा हाच योग्य काळ असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्वत: घाटांमधून बाईक चालवून दाखवून दिले.

रॉयल एनफील्ड इंटरसेप्टर ६५० ही दोन सिलेंडर सध्याच्या घडीला देशामधील सर्वात स्वस्त बाईक आहे. ही बाईक भारतामध्ये दाखल झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्ये ती दोन सिलेंडर असणारी देशात सर्वाधिक विकली गेलेली बाईक ठरली. सहा मॅन्युअल गेअर असणाऱ्या या बाईकची किंमत दोन लाख ३७ हजार रुपये इतकी आहे.