भाजपाच्या आमदार अनुपमा जयस्वाल यांच्या असंवेदनशीलतेचा कळस समोर आला आहे. त्यांच्या मतदारसंघात ४५ दिवसात ७० मुलं दगावली आहेत. तापामुळे ही मुलं दगावली आहेत. याबाबत व्यवस्था बघण्याआधी किंवा त्यांच्या आई वडिलांची विचारपूस करणे तर दूरच अनुपमा जयस्वाल या गणपती उत्सवात सहभागी झाल्या आणि नाचल्या. त्या संदर्भातला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लाल साडी परिधान करून आपल्या नवऱ्याच्या हातात हात घेऊन नाचतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. बहरिच येथील हा व्हिडिओ आहे.

यानंतर विरोधी पक्षांनी भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल यांच्यावर टीकेचा भडीमार सुरु केला. समाजवादी नेते सुनील सिंग यांनी मागील वर्षी ६० मुले दगावली. त्यावेळी योगी आदित्यनाथ यांची आदित्यनाथ यांची असंवेदनशीलता दिसून आला. आता पुन्हा एकदा भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल यांचीही असंवेदनशीलता दिसून आली. मागील ४५ दिवसात सुमारे ७० मुलांचा मृत्यू झाला. मात्र याबाबत कोणतीही संवेदना न दाखवता अनुपमा जयस्वाल यांनी गणपती उत्सवात नाच करणे पसंत केले. त्यांना जराही माणुसकी आहे की नाही? असा प्रश्नच समाजवादी पक्षाने उपस्थित केला आहे.

अनुपमा जयस्वाल यांनी जी असंवेदनशीलता दाखवली आहे त्यात नवे काही नाही. एकीकडे मतदार संघातली मुलं दगावत असताना दुसरीकडे भाजपाच्या आमदाराला नाच सुचतो आहे यापेक्षा मुर्दाड मनोवृत्ती काय असू शकते? असा प्रश्न काँग्रेस नेते अंशू अवस्थी यांनी उपस्थित केला आहे. अनुपमा जयस्वाल याआधीही वादाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या. दलितांच्या घरी डास चावले तरीही आम्ही त्यांच्या घरी थांबलो होतो असे वादग्रस्त वक्तव्य अनुपमा जयस्वाल यांनी केले होते. आता त्यांच्या नाचामुळे त्यांच्यावर पुन्हा एकदा टीका होताना दिसते आहे.