केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांची एके-४७ने हत्या करण्याची धमकी शेखपुरा येथील एक नगरसेवक देत असलेला एक चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर पोलिसांनी त्याबाबतचा तपास सुरू केला आहे.

नगरसेवक संजय यादव हा रामविलास पासवान आणि त्यांचा पुत्र चिराग पासवान यांच्याबद्दल अपशब्द वापरत असल्याचेही या चित्रफितीमध्ये दिसत आहे. पासवान यांनी गरीब व गरजूंना शिधापत्रिका दिल्या नाहीत, असा आरोप यादव याने केला आहे. एलजेपीचे जिल्हा अध्यक्ष इमाम गजाली यांनी बुधवारी याबाबत शेखपुराच्या पोलीस अधीक्षकांकडे तक्रार सादर केली असून यादव याच्याविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर यादव फरार झाला आहे, असे पोलिसांनी सांगितले.