आजोबा नातवांच्या प्रेमाचे अनेक किस्से तुम्ही आजवर ऐकले असतील. पण, काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियात घडलेल्या एका प्रसंगात आजोबांनी आपल्या प्राणांची बाजी लावून नातीला वाचविले. भारतात राहणारे हे 62 वर्षांचे आजोबा ऑस्ट्रेलियात आपल्या कुटुंबाबरोबर प्रवास करत होते. तेव्हा त्यांचे संपूर्ण कुटूंब सिडनीमधील वेंटवर्थविल्ले या रेल्वे स्थानकावर तिकीटासाठी थांबले होते. यावेळी त्यांच्यासोबत अठरा महिन्यांची चिमुकली होती. लहान मुलांसाठी असलेल्या चाकांच्या गाडीत तिला बसविण्यात आले होते. मात्र, फलाटावर रेल्वेरुळाच्या दिशेने उतार असल्याने चिमुकली असलेली गाडी रेल्वे रूळांच्या दिशेने गेली आणि खाली पडली. या गाडीतील चिमुकली ट्रॅकवर पडल्याचे लक्षात आल्यानंतर आजोबांनी लगेच धावत जाऊन ट्रॅकवर उडी मारली आणि आपल्या नातीला उचलले. चिमुकलीला कडेवर घेऊन त्यांनी तिला तिच्या आईच्या ताब्यात दिले. त्यानंतर आजोबाही रेल्वेरूळावरून बाजूला झाले आणि काही क्षणांतच रुळांवरून गाडी वेगात धडधडत निघून गेली. हा सगळा थरारक प्रकार स्थानकावरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.