13 November 2019

News Flash

Video : संतापजनक! मेंदूज्वरासंबंधित बैठकीत आरोग्य मंत्र्यांनी विचारला चक्क भारत-पाक सामन्याचा स्कोअर

बिहारमध्ये मेंदूज्वराने थैमान घातले असून अनेक लहान मुले दगावली आहेत

बिहारचे आरोग्य मंत्री मंगल पांडे

भारतीय संघाने विश्वचषक स्पर्धा २०१९ मध्ये पाकिस्तानवर ८९ धावांनी मात केली. भारताने प्रथम फलंदाजी करत ३३६ धावांचा डोंगर उभारला आणि त्यांना ३३७ धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानची अवस्था ३५ षटकात ६ बाद १६६ अशी झाली होती. ३५ व्या षटकानंतर पाऊस पडल्यामुळे हे आव्हान डकवर्थ लुईस नियमानुसार उर्वरित ५ षटकात १३६ धावा अशा स्वरूपाचे करण्यात आले. हे आव्हान पाकिस्तानला पेलले नाही.

एकीकडे भारतीय नागरिक विजयाचा आनंद साजरा करत असताना बिहारमध्ये शोककळा पसरली होती. बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये अॅक्युट इन्सेफलायटिस सिन्ड्रोम (एईएस) या मेंदूज्वराने थैमान घातले. त्यात अनेक लहान मुले दगावली. या संबंधीची तातडीची बैठक बिहार आरोग्य विभागाने रविवारी घेतली. या बैठकीत अत्यंत महत्वाच्या आणि गंभीर विषयांवर चर्चा होणे अपेक्षित होते. पण याच बैठकीदरम्यान बिहारचे आरोग्य मंत्री मंगल पांडे यांनी चक्क चालू बैठकीत भारत-पाक सामन्याचा स्कोअर विचारला. ANI ने या बाबतचा व्हिडीओ ट्विट केला असून या नंतर पांडे यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.

दरम्यान, रविवारी झालेल्या सामन्यात भारतीय फलंदाजांच्या आक्रमक खेळापुढे पाकिस्तानचे गोलंदाज पुरते हतबल झाले. नाणेफेक जिंकून पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमदने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्याचा हा निर्णय पुरता फसला. रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी १३६ धावांची शतकी भागीदारी केली. यादरम्यान दोन्ही खेळाडूंनी आपली अर्धशतकं पूर्ण केली. वहाब रियाझने लोकेश राहुलचा अडसर दूर करत भारताला पहिला धक्का दिला. यानंतर रोहित शर्माने कर्णधार विराट कोहलीच्या सोबतीने संघाचा डाव सावरला.

दोन्ही खेळाडूंमध्ये दुसऱ्या विकेटसाठी ९८ धावांची भागीदारीही झाली. अखेरीस रोहित शर्मा हसन अलीच्या गोलंदाजीवर माघारी परतला. त्याने १४० धावांची खेळी केली. यानंतर हार्दिक पांड्याने फटकेबाजी करत विराट भारताच्या धावसंख्यात भर घातली. पांड्या माघारी परतल्यानंतर धोनीही अवघी एक धाव काढून माघारी परतला. अखेरीस धोनीने विजय शंकरच्या साथीने संघाला ३०० धावांचा टप्पा ओलांडून दिला. विराट कोहलीही ७७ धावांवर मोहम्मद आमिरच्या गोलंदाजीवर माघारी परतला. पाऊसाचा व्यत्यय थांबल्यानंतर आमिरने त्याची विकेट घेतली. यानंतर केदार जाधव आणि विजय शंकर जोडीने फटकेबाजी करत संघाला ३३६ धावांचा टप्पा गाठून दिला. पाकिस्तानकडून मोहम्मद आमिरने ३ तर हसन अली आणि वहाब रियाझ यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.

भारताने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात अडखळती झाली. इमाम उल-हक विजय शंकरच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. यानंतर सलामीवीर फखार झमान आणि बाबर आझम यांनी दुसऱ्या विकेटसाठी १०४ धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला. या दरम्यान फखार झमानने आपलं अर्धशतक साजरं केलं. अखेरीस कुलदीप यादवने बाबर आझमचा त्रिफळा उडवत पाकिस्तानची जोडी फोडली. केवळ दोन धावांनी बाबर आझमचं अर्धशतक हुकलं. त्यानंतर पाकिस्तानच्या डावाला गळती लागली. फखार झमान, मोहम्मद हाफिज, शोएब मलिक हे मातब्बर फलंदाज एकामागोमाग एक माघारी परतत राहिले.

मधल्या फळीत कर्णधार सर्फराज अहमद आणि इमाद वासिम यांनी थोडीफार झुंज दिली. पण वरुणराजाने पाकिस्तानसमोरचं लक्ष्य आणखीन कठीण करुन ठेवलं. विजय शंकरने सरफराजचा त्रिफळा उडवत पाकिस्तानला बॅकफूटला ढकललं. यानंतर विजयासाठी आवश्यक असणारं लक्ष्य पाकिस्तानचा संघ पूर्ण करु शकला नाही. भारताकडून विजय शंकर, हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले.

First Published on June 18, 2019 11:04 pm

Web Title: video world cup 2019 ind vs pak bihar health minister mangal pandey match score vjb 91