केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) वेणूगोपाल धूत यांच्या व्हिडीओकॉन समूह व दीपक कोचर संस्थापक असलेल्या नूपॉवर रिन्युएबलच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. व्हिडीओकॉनच्या व नूपॉवरच्या कार्यालयांवर छापेही मारण्यात आले आहेत. गुरूवारी ही कारवाई करण्यात आली. दीपक कोचर हे आयसीआयसीआय बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालिका व सीईओ चंदा कोचर यांचे पती आहेत.

आयसीआयसीआय व्हिडीओकॉन कर्जवाटपासंदर्भात ही कारवाई करण्यात आली आहे. आयसीआयसीआय बँकेने व्हिडीओकॉनला कर्ज देण्याच्या बदल्यात दीपक कोचर यांना व्हिडीओकॉननं सहाय्य करावं असं मूळ तक्रारीचं स्वरूप आहे. या आरोपांमुळेच चंदा कोचर यांना आयसीआयसीआय बँकेच्या प्रमुखपदाचा त्याग करावा लागला होता. चंदा कोचर आयसीआयसीआयच्या प्रमुख असताना धूत यांच्या व्हिडीयोकॉनला ३,२५० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले होते. या कर्जाच्या बदल्यात वेणूगोपाल धूत यांनी दीपक कोचर यांच्या नूपॉवरमध्ये ६४ कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचा आरोप एका समभागधारकानं केला होता.

या आरोपांनंतर गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये चंदा कोचर आयसीआयसीआय बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक व सीईओ या पदावरून पायउतार झाल्या होत्या.

छाया: गणेश शिर्सेकर

सीबीआयनं गेल्या वर्षी मार्च महिन्यात वेणूगोपाल धूत, दीपक कोचर व अन्य काही जणांविरोधात या प्रकरणावरून प्राथमिक चौकशी सुरू केली होती, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. गुन्हा दाखल करण्यापूर्वी प्राथमिक चौकशी करणं हा तपास प्रक्रियेचा एक भाग असून गुन्हा दाखल करण्यासाठी पुरेसा पुरावा आहे का याची माहिती चौकशीत घेण्यात येते. सकृतदर्शनी गुन्हा घडल्याचे आढळल्यास गुन्हा दाखल करण्यात येतो आणि मोठ्या प्रमाणावर तपासकार्य हातात घेण्यात येते. सीबीआयने गुरुवारी कंपनीच्या मुंबई, औरंगाबादमधील कार्यालयांवर छापा टाकला.