News Flash

सत्तांतराची परंपरा खंडित; विजयन यांची ऐतिहासिक किमया

१४० जागांपैकी ९७ जागा जिंकून बहुमताचा ७१ हा आकडा पार केला आहे.

प्रत्येक विधानसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांविरोधात कौल देण्याची चार दशकांची केरळमधील राजकीय परंपरा मुख्यमंत्री पी. विजयन यांनी खंडित केली आहे. सत्ताधारी आघाडीला पुन्हा सत्तेवर आणून विजयन यांनी इतिहास घडवला आहे.

१९७७च्या निवडणुकीत काँग्रेस आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांची संयुक्त आघाडी सत्तेवर आली आणि काँग्रेसचे के. करुणाकरण मुख्यमंत्री झाले. त्यानंतरच्या १९८०च्या निवडणुकीत डाव्या आघाडीचे सरकार सत्तेवर आले आणि माक्र्सवादी कम्युुनिस्ट पक्षाचे इ. के. नयनार मुख्यमंत्री बनले. तेव्हापासून कालपर्यंत केरळमध्ये कधी माक्र्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखालील डाव्या लोकशाही आघाडीला  (एलडीएफ) सत्ता, तर पुढच्या निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त लोकशाही आघाडी (यूडीएफ)चे सरकार असे सत्तांतर होत राहिले. या निवडणुकीत मात्र सत्तांतराची परंपरा खंडित झाली आहे. डाव्या लोकशाही आघाडीने १४० जागांपैकी ९७ जागा जिंकून बहुमताचा ७१ हा आकडा पार केला आहे. त्यामुळे पी. विजयन सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदावर विराजमान होतील.

१९८०च्या निवडणुकीच्या वेळी केरळमध्ये माक्र्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली एलडीएफ आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखाली यूडीएफ या दोन आघाड्या स्थापन झाल्या. काँग्रेस आणि केरळ काँग्रेस (मणि) यांच्यात वितुष्ट आले आणि ई. के. नयनार यांच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळले. त्यानंतर तेथे राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आणि १९८२मध्ये मध्यावधी निवडणूक घेण्यात आली. १९८२ च्या निवडणुकीनंतर काँग्रेसप्रणीत यूडीएफचे सरकार स्थापन झाले आणि के. करुणाकरण मुख्यमंत्री बनले.

डावी आघाडी सत्तास्थापनेकडे

थिरूवनंतपुरम : केरळमध्ये माक्र्सवादी कम्युनिस्ट पक्षप्रणीत डाव्या लोकशाही आघाडीने (एलडीएफ) ऐतिहासिक विजय संपादन केला आहे. डाव्या आघाडीने १४० पैकी ९७ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे कधी काँग्रेसप्रणीत संयुक्त लोकशाही आघाडी (यूडीएफ), तर कधी एलडीएफ अशी सत्तांतराची गेल्या चार दशकांची परंपरा खंडित झाली आहे.

मुख्यमंत्री पी. विजयन यांच्या नेतृत्वाखाली डाव्या आघाडीने सलग दुसऱ्यांदा बहुमत मिळवण्याची किमया साधली आहे. मुख्यमंत्री विजयन कन्नूर जिल्ह्यातील धर्मदाम मतदारसंघातून सुमारे ५० हजार मतांच्या आघाडीने विजयी झाले आहेत. केरळमध्ये डाव्या आघाडीने सत्ता राखली आहे.

मतमोजणी सकाळी ८ वाजता सुरू झाली. तेव्हापासून प्रत्येक मतमोजणी फेरीचा कौल डाव्या आघाडीकडे होता. डाव्या आघाडीने प्रारंभापासून ८५ जागांवर आघाडी घेतली होती, तर काँग्रेसप्रणीत यूडीएफ ४४ जागांवर पुढे होती. भाजपप्रणीत आघाडी तीन मतदारसंघात आघाडीवर होती.

मुख्यमंत्री विजयन यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी आरोग्यमंत्री के. के. शैलजा, कडकमपल्ली सुरेंद्र हे आघाडीवर होते, तर जे. अम्मा मात्र मागे पडल्या होत्या. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश चेन्नीथल, माजी मुख्यमंत्री ओमन चंडी, टी. राधाकृष्णन आणि पी. टी. थॉमस यांनी प्रारंभी आघाडी घेतली होती.  भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन मंजेश्वरम आणि कोन्नी या दोन्ही मतदारसंघांत मागे पडले होते.

मेट्रोमॅन श्रीधरन  यांचा पराभव

थिरूवनंतपुरम : जिंकण्याची एकमेव आशा असलेल्या पलक्कड मतदारसंघात भाजपचा पराभव झाला. मेट्रोमॅन अशी ख्याती असलेले ८८  वर्षीय ई. श्रीधरन यांचा काँग्रेसचे विद्यमान आमदार शफी परमबिल यांनी तीन हजार मतांनी पराभव केला. निवडणूक प्रचाराच्या वेळी श्रीधरन यांना मतदारांचा मोठा पाठिंबा मिळत होता. त्यामुळे त्यांना विजयाची खात्री होती.  यावेळी प्रथमच काँग्रेस आणि भाजप अशी लढत झाली. मतदारसंघात उच्चवर्णीय हिंदू मतदारांचा प्रभाव आणि श्रीधरन यांची मेट्रोमॅन ही ख्याती यामुळे ही जागा भाजपला मिळू शकते, असा निरीक्षकांचा अंदाज होता.

पि. विजयन

केरळचे मुख्यमंत्री पि. विजयन यांनी प्रत्येक निवडणुकीनंतर होणारी सत्तांतराची चार दशकांची परंपरा खंडित करण्याचा इतिहास घडवला. केरळमधील सुशिक्षित आणि सुज्ञ मतदारांनी पुन्हा एलडीए या डाव्या आघाडीला स्पष्ट कौल दिला आहे. त्यात विजयन यांचा मोठा वाटा आहे. करोना साथीच्या संकटकाळात त्यांनी सत्तांतराची परंपरा खंडित करण्याची किमया साधली आहे. त्यांचा जन्म कन्नूर जिल्ह्यातील एका गरीब कुटुंबात झाला. विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून सक्रिय राजकारणात उतरले. जिल्हास्तरावर त्यांनी माक्र्सवादी कम्युनिस्ट पक्षाने दिलेल्या विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. १९९८मध्ये ते पक्षाचे केरळ राज्य सरचिटणीस बनले. २०१६च्या निवडणुकीनंतर ते मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. त्यापूर्वी त्यांनी अनेक महत्त्वाची खाती सांभाळली होती. ते १९९६मध्ये पय्यनूर येथून प्रथम निवडून आले. त्यानंतर त्यांनी ऊर्जामंत्रीपद सांभाळले. पक्षाच्या पॉलिटब्यूरोचे सदस्यपद त्यांना २००२मध्ये देण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2021 12:32 am

Web Title: vidhan sabha elelction congress bjp political tradition chief minister p vijayan akp 94
Next Stories
1 पुदुच्चेरीत भाजप आघाडीला सत्ता
2 जयललिता यांच्या पश्चात अण्णा द्रमुकचा प्रभाव कायम
3 देशात रुग्णसंख्येत घट !
Just Now!
X