व्हिएतनाममध्ये स्वस्त विमान सेवा देणारी कंपनी म्हणून लोकप्रिय असणाऱ्या ‘वियतजेट एअरलाइन्स’ने भारतामधून विमानसेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. याच निमित्त ‘वियतजेट एअरलाइन्स’ने भारतीयांसाठी विशेष सवलत दिली असून केवळ ९ रुपयांमध्ये तिकीट उपलब्ध करुन देण्यात आली आहे. विशेष लॉन्चिंग ऑफर म्हणून हे दर अगदी मर्यादित तिकिटांवर देण्यात आले आहेत. बिकीनीमध्ये असणाऱ्या एअरहोस्टेस अशी ‘वियतजेट एअरलाइन्स’ची ओळख आहे.

काय आणि कधीपर्यंत आहे ही ऑफर

भारतामधून थेट व्हिएतनामची सेवा सुरु करणार असल्याने कंपनीने तीन दिवसांसाठी ‘गोल्डन डेज ऑफर’ भारतीयांसाठी दिली आहे. ही ऑफर २० ऑगस्टपासून सुरु झाली असून ती २२ ऑगस्टपर्यंत उपलब्ध असणार आहे. कंपनी नवीन दिल्ली ते हो-ची-मीन सिटी आणि हनोई या शहरांदरम्यान थेट विमानसेवा सुरु करणार आहे. ‘गोल्डन डेज ऑफर’दरम्यान ग्राहकांना अवघ्या ९ रुपयांमध्ये तिकीट विकत घेता येणार आहे. मात्र या किंमतीवर प्रवास कर (फेअर वॅट), विमानतळ फी आणि इतर अधिभार ग्राहकांना भरावा लागणार आहे.

कशी करता येणार तिकीट खरेदी

कंपनीच्या http://www.vietjetair.com या वेबसाईटवरुन विशेष सवलतीमध्ये तिकीट खरेदी करता येणार आहे. याशिवाय ‘वियतजेट एअर’ या कंपनीच्या मोबाइल अॅप्लिकेशनमधून ६ डिसेंबर २०१९ पासून २८ मार्च २०२० पर्यंतची तिकीटे खरेदी करता येणार आहेत.

वियतजेट एअरलाइन्स

असे असणार वेळापत्रक

नवी दिल्लीवरुन ६ डिसेंबर २०१९ पासून दर आठवड्याला सोमवारी, बुधवारी, शुक्रवारी आणि रविवारी हो-ची-मीन सिटीदरम्यान कंपनी चार फेऱ्या सुरु करणार आहे. तर हनोई ते नवी दिल्ली ही सेवा ७ डिसेंबर २०१९ पासून दर आठवड्याला मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी उपलब्ध असणार आहे. हो-ची-मीन सिटीमधून निघणारे विमान संध्याकाळी सात वाजता उड्डाण करुन रात्री दहा वाजून ५० मिनिटांनी नवी दिल्ली विमानतळावर उतरेल. तर नवी दिल्लीवरुन उड्डाण करणारे विमान ११ वाजून ५० मिनिटांनी उड्डाण करुन हो-ची-मीन सिटीमध्ये पहाटे ६ वाजून १० मिनिटांनी पोहचेल.