दक्षिण चीन समुद्रातील वादग्रस्त बेटांवरून निर्माण झालेला पेचप्रसंग सुटला नाही आणि चीनने आपला हेकेखोरपणा कायम ठेवला तर या प्रश्नावर आंतरराष्ट्रीय स्तरावरून मध्यस्थी करण्यात यावी, अशी मागणी व्हिएतनामने केली आहे.
चीनच्या दक्षिण समुद्रात सुरू असलेल्या कारवाया बघता, आंतरराष्ट्रीय मध्यस्थीची मागणी करावी की नाही याचा अद्याप निर्णय झालेला नाही परंतु व्हिएतनामसमोर दुसरा पर्याय राहणार नाही, असे व्हिएतनामच्या संरक्षण विभागाचे उपमंत्री नाग्यूएन चि व्हिन्ह यांनी सिंगापूर येथे सांगितले. हा मुद्दा आंतरराष्ट्रीय न्यायालयात आणू नये, असे चीन आम्हाला नेहमी दटावत असतो, मात्र चीनच्या कारवाया आणि त्यांचे एकूण वर्तन यावर आमची भूमिका राहील आणि आमच्यासमोर दुसरा कोणताही पर्याय शिल्लक राहणार नाही, असेही व्हिन्ह यांनी स्पष्ट केले. वादग्रस्त बेटांप्रकरणी व्हिएतनाम आपला सार्वभौमत्वाचा हक्क सोडणार नाही, असे त्यांनी सांगितले.
चीनची भूमिका कोणती..
दरम्यान, व्हिएतनामने अशी जाहीर मागणी केल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या मुद्दय़ावर चीन आता कोणती भूमिका घेईल, याकडेही राजकीय मुत्सद्दय़ांचे लक्ष लागले आहे.