आपल्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन करून चीन हा दक्षिण चिनी समुद्रात कारवाया करत असल्याचा आरोप व्हिएतनामने केला असून, चिनी नेतृत्वासोबतच्या आगामी बोलण्यांमध्ये भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सागरी सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करतील अशी आशा व्यक्त केली आहे.
चीनने स्पार्टली बेटांवर केलेल्या कारवाया म्हणजे या भागातील आमच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन आहे, असे व्हिएतनामच्या परराष्ट्र माहिती संचालनालयाचे महासंचालक ली व्ॉन न्घिएम यांनी भारतीय पत्रकारांशी बोलताना सांगितले. भारत आणि व्हिएतनाम यांचे नेहमीच चांगले संबंध राहिलेले असून, चीनने ज्यावेळी विशेषत: आमच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या स्पार्टली बेटांवर अतिक्रमण करून आमच्या सार्वभौमत्वाचा भंग करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा दिल्लीने नेहमीच हनोईला पाठिंबा दिलेला आहे असे ते म्हणाले.
आग्नेय आशियातील सागरी सुरक्षिततेचा प्रश्न मोदी व चीनचे पंतप्रधान यांच्यात चर्चेला येईल का ते आम्हाला माहीत नाही. परंतु भारताने चीनसमोर आपली भूमिका मांडली, तर व्हिएतनाम व भारत या दोघांसाठीही ते फायद्याचे ठरेल, असे मत व्ॉन यांनी व्यक्त केले.
दक्षिण चिनी समुद्राच्या जवळजवळ संपूर्ण भागावर चीन आपला हक्क सांगतो, परंतु व्हिएतनाम, फिलिपिन्स, मलेशिया, ब्रुनेई व तायवान हे देश त्याचा जोरदार विरोध करत आलेले आहेत.