काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी देशाच्या आर्थिक स्थितीवरून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले आहे. मोदींनी जीडीपीची घसरगुंडी आणि जीएसटीच्या अंमलबजावणीचा उडालेला बोजवारा या गोष्टींकडे निवडणुकीच्या नव्हे तर सामान्य लोकांचा त्रास कमी करण्याच्या दृष्टीकोनातून पहावे, असा सल्ला त्यांनी दिला. या सगळ्या परिस्थितीमुळे सामान्य लोकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे त्यांच्याच नजरेतून आर्थिक घसरगुंडी आणि जीएसटीच्या अंमलबाजवणीतील अपयशाकडे पाहणे अधिक सयुक्तिक ठरेल. तसेच सरकारने जीएसटीचे शाब्दिक अवडंबर माजवण्यापेक्षा ही करप्रणाली उत्तम व साधी करण्यावर भर द्यावा, असा टोलाही राहुल यांनी लगावला. यासाठी जीएसटीच्या रचनेत बदल होणे गरजेचे आहे. याशिवाय, पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणले जावे, अशी मागणीही त्यांनी केली.

मोदी सरकारच्या ‘मेक इन इंडिया’मध्ये दिवसाला फक्त ४०० नोकऱ्या: राहुल गांधी

याशिवाय, जीएसटीमुळे कृषी क्षेत्रापुढे मोठे संकट उभे राहिल्याचे सांगितले. कीटकनाशके, खत, ट्रॅक्टर, शेतीची अवजारे, शीतगृहे आणि गोदामांची बांधणी या सगळ्यांवर जीएसटी लागल्याने या गोष्टी महागल्या आहेत. तर दुसरीकडे जीएसटीच्या रचनेमुळे देशात रोजगाराची निर्मिती करण्यात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या वस्त्रोद्योग क्षेत्रही आर्थिक गर्तेत सापडले आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर जीएसटीच्या ‘वन नेशन, सेव्हन टॅक्स’ या रचनेत बदल झाले पाहिजेत. तसेच फॉर्म भरण्याच्या आणि नियमांच्या जंजाळातून हा कायदा मुक्त झाला पाहिजे, असे मत राहुल गांधी यांनी व्यक्त केले.

‘हिंदुत्वाच्या प्रयोगशाळे’त राहुल यांचे मनाचे प्रयोग!