चीनमध्ये भारताचे राजदूत म्हणून काम केलेले आणि महाराष्ट्राचे सुपुत्र विजय केशव गोखले हे आता देशाचे नवे परराष्ट्र सचिव असणार आहेत. विजय केशव गोखले यांची परराष्ट्र सचिवपदी नियुक्ती झाल्याची माहिती ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने दिली आहे. सध्याचे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांचा कार्यकाळ २८ जानेवारीला संपणार आहे. त्याचमुळे या पदावर विजय केशव गोखले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील दोन वर्षांसाठी ते भारताचे परराष्ट्र सचिव असतील.

चीन आणि भारत यांच्यात निर्माण झालेला डोकलाम वाद सोडवण्यात विजय केशव गोखलेंनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. १९८१ च्या बॅचचे ते आयएफएस अधिकारी आहेत. सध्या ते परराष्ट्र मंत्रालायाच्या आर्थिक संबंधांचे सचिव म्हणून काम करत आहेत. मात्र त्यांनी जर्मनीतही भारताचे राजदूत म्हणून काम केले आहे. तसेच हाँगकाँग, चीन आणि अमेरिका या देशांमध्येही त्यांनी काम केले आहे.

भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये डोकलामचा सीमा प्रश्न निर्माण झाला होता. ५० दिवसांपेक्षा जास्त काळ सुरू असलेला हा वाद सोडवण्यात विजय केशव गोखले यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. बीजींगमध्येही त्यांनी आपले राजकीय कौशल्य वापरून हा वाद संपुष्टात आणण्यासाठी शिष्टाई केली.

चीनला दोन पावले मागे घ्यायला लावण्यात गोखले यांचा सिंहाचा वाटा आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. पुढील दोन वर्षांसाठी देशाचे परराष्ट्र सचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विजय गोखले हे मूळचे पुण्याचे आहेत. विजय गोखले यांच्या आधी १९७९ ते १९८२ या कालावधीत पुण्याचे राम साठे हे देशाचे परराष्ट्र सचिव होते. त्यांच्यानंतर एका मराठी माणसाला दुसऱ्यांदा परराष्ट्र सचिव होण्याचा मान मिळाला आहे.

एस. जयशंकर यांचा कार्यकाळ २८ जानेवारी रोजी संपतो आहे. २९ जानेवारी २०१५ रोजी एस जयशंकर यांची परराष्ट्र सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर २०१७ मध्ये त्यांना एक वर्षाची बढतीही देण्यात आली. आता त्यांच्या जागेवर विजय केशव गोखले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. २९ जानेवारी २०१८ पासून गोखले पदभार सांभाळतील.